Hasan Mushrif | गोकुळच्या ४ हजार ९०० मतांवर हे राज्यात परिवर्तन करायला चालले

मंत्री मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांना टोला; माझा हात धराल, एवढे तुम्ही मोठे झाला का?
Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : गोकुळमध्ये यांना केवळ ४९०० मते मिळाली, त्यावर राज्यात परिवर्तन करायला चालले, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. सतेज पाटील यांना लगावला. गोकुळ अध्यक्ष निवडीनंतर विजयी सभेत ते बोलत होते. जर मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला नसता तर हे निवडून आलेले १३ लोक घरी बसले असते आणि प्रशासक आला असता. निवडलेल्या २५ जणांच्या हाती कारभार राहावा म्हणून हा अध्यादेश काढला, असे सांगत कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर आम्ही पुन्हा सभांना गैरहजर राहून प्रशासक आणू आणि तुम्हाला घरी घालवू, त्यामुळे बंटी पाटील, कालची सभा ही तुमची शेवटची सभा समजा, असा इशाराही त्यांनी दिला.

गोकुळमध्ये त्यांनीही निवडणुका लढवल्या, आम्हीही लढवल्या. पण हे खरे आहे की, आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर सत्ता आली. पण, तुम्ही एवढे मोठे झाला की, माझा हात धराल? असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, २०१६ च्या विधान परिषद निवडणुकीत आपण आणि विनय कोरे यांनी ठरवले म्हणून तुम्ही विजयी झाला. कुणाचा हात धरून तुम्ही विधान परिषदेत गेला? आम्ही नसतो तर तुम्ही त्यावेळी मंत्रीही नसता.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अध्यक्ष निवडीत कोरममुळे पेच निर्माण झाला. भविष्यकाळात ही संस्था लोकांच्या हितासाठी काम करत राहणे आवश्यक असल्याने सरकारने अध्यादेशाचा निर्णय घेतला. खा. धनंजय महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांनी सप्तगंगा कारखान्यातील सभासद बाहेर काढून तो कारखाना बळकावला. मौनी विद्यापीठही अशाच प्रकारे ताब्यात घेतले.

आ. विनय कोरे म्हणाले, कोरमअभावी सभा तहकूब झाल्यास प्रशासक नेमण्याचा कायदा काय आम्ही केलेला नव्हता? आमच्यापेक्षा एक जागा जादा जिंकून कोणी महाराष्ट्र जिंकला असे म्हणत असेल तर परमेश्वर कुणाच्या बाजूने आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुजित मिणचेकर यांचीही भाषणे झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.