

कोल्हापूर : गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा तिढा सोडविण्यासाठी समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी आ. सतेज पाटील यांनी मोर्चातून शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटवून स्वतः त्या पदावर विराजमान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठीच त्यांनी सोमवारी राज्यभरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोल्हापुरात आणले. गोकुळचा प्रश्न जिल्ह्यापुरता मर्यादित असताना स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी हा राजकीय डाव खेळला, असा जोरदार हल्लाबोल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. सतेज पाटील यांच्यावर केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणणाऱ्यांनी न्यायालयात जाऊन कोरम रद्द करून आणायला हवा होता. आम्ही त्यांना अध्यक्ष निवडीपासून अडविले नव्हते. तसेच योग्य वेळ आल्यावर शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करणार असल्याचा पुर्नरुच्चार त्यांनी केला. आ. सतेज पाटील यांनी अध्यक्ष निवडीत समन्वयातून मार्ग काढणे आवश्यक होते; मात्र आता न्यायालयानेच त्यांना चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते.
त्यांनी संचालकांना उपस्थित ठेवा सांगितले
आ. सतेज पाटील यांनी २८ ऑक्टोबरला फोन करून संचालकांना अध्यक्ष निवड बैठकीला उपस्थित ठेवण्यास सांगितले होते; मात्र एकत्र बसून चर्चा करू, सत्ता वाटून घेऊ, असा प्रस्ताव त्यांनी दिला नाही, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. महायुतीचा अध्यक्ष होणार असल्याने कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी येतील. पण, आम्ही कोणताही गोंधळ न करता संयमाने अध्यक्ष निवडीची प्रक्रीया पूर्ण करू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कायदा सुव्यवस्था पोलिस बघतील
माजी खा. शेट्टी यांनी दिलेल्या इशार्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ते शासनाने नियुक्त केलेले संचालक आहेत. त्यांची सुरक्षा शासन बघेल. कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिस प्रशासन खबरदारी घेईल.