

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि गोकुळचा अध्यक्षही महायुतीचाच होईल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघास दिलेल्या भेटीबाबत मुश्रीफ म्हणाले, शिवाजी पाटील हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती घेतली असेल. जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची नोंद कारखानदार घेतील.
ऑडिओ क्लिपप्रकरणी मुश्रीफ म्हणाले, मी प्रसारमाध्यमांतून याबाबत पाहिले आहे. त्याबाबत मला माहिती नाही. माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांबाबत ते म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर हे सर्व ‘पेल्यातील वादळ’ ठरेल आणि सर्व वाद शांत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुश्रीफ म्हणाले, आमदार रोहित पवार आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावे, हेच फार मोठे आश्चर्य आहे. महाडिक यांच्या मौनाबाबत आणि चौकशीच्या मागणीबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ज्यांनी चौकशीची मागणी केली आहे, त्यांनाच विचारा. माझा त्याच्याशी काय संबंध? मीदेखील मौन धारण केले आहे. मी मंत्री आहे म्हणून तुम्ही मला विचारता. त्यांनाही जाऊन विचारा, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.