

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत यामध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वलस्थानी ठेवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करावेत, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे मंगळवारी (दि. 10) होणार्या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते जातील, असे उद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत मुश्रीफ बोलत होते.
ना. मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले, युवराज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, रणजितसिंह पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, शहराध्यक्ष आदिल फरास, महिला शहराध्यक्ष रेखा आवळे आदी उपस्थित होते.
महायुतीमधील काही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. असे असेल तर आपणही स्वबळावर लढण्याची तयारी करूया, असे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात अजित पवार आणि कोल्हापुरात हसन मुश्रीफ हिमालयासारखे नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्याना त्यांच्या हक्काचा वाटा मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विधानसभेचा अपवाद वगळता आपण मुश्रीफ यांच्यापासून कधी बाजूला गेलो नाही, असे माजी आ. के. पी. पाटील म्हणाले.