

कोल्हापूर : विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांची निवडणूक यामध्ये फरक असतो. प्रत्येकाचे संदर्भ वेगळे असतात. सहकारी संंस्थांच्या निवडणुकीमध्ये विकासाचा द़ृष्टिकोनातून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून अनेक पक्षाचे लोक एकत्र येत असतात. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालाचा किंवा बदललेल्या राजकीय परिस्थितीचा गोकुळ किंवा अन्य सहकारी संस्थांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही, असे आ. हसन मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितले. मात्र आगामी निवडणुकीत गोकुळच्या निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुती म्हणून लढविली जाईल, असेही ते म्हणाले.
मुश्रीफ म्हणाले, सहकार क्षेत्र वेगळे आहे. सहकारामध्ये काम करत असताना आम्ही विविध पक्षांतील सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतो. याठिकाणी सहकाराच्या माध्यमातून होणारा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात दिसणारे लोक सहकारी संस्थांमध्ये एकत्र आलेले दिसतात. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही निम्म्यापेक्षा अधिक जागा बिनविरोध केल्या. बँकेत सर्वजण आम्ही एकदिलाने काम करत आहोत.
गोकुळमध्ये देखील तूर्त बदल होण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात काही बोलले जात असेल तर आम्ही वरिष्ठांना याबाबतची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करू, मात्र गोकुळच्या आगामी निवडणुकीत सध्याची आघाडी राहण्याची शक्यता कमी आहे. त्यावेळची समिकरणे बदलतील. महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन त्यांच्यामार्फत ही निवडणूक लढवावी लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.
समरजित घाटगे यांनी ईडीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला दिलेला त्रास कागल मतदारसंघातील जनतेलाच आवडला नाही, असे सांगून मुश्रीफ यांनी शाहू दूध संघ बंद केला, त्याला मिळालेल्या 32 कोटींच्या अनुदानाची चौकशी लावलीच पाहिजे. परंतु चौकशीची मागणी करणे आपल्या स्वभावात नाही. आजपर्यंत आपण कोणाचेही वाईट चिंतले नसल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.