

मुरगुड: हिटलर नव्हे; मी गोरगरीब जनतेचा सेवक आहे, असा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमावर शून्यातून मोठा झालेला मी कार्यकर्ताच आहे, असेही ते म्हणाले. त्यांना खरे दु:ख मी आणि समरजीतसिंह घाटगे एकत्र आल्याचे झाले असावे. त्यांची ती जखम अजूनही जाईनाशी झाली आहे. भविष्यात आपलं काय होईल या भीतीतूनच हे उद्गार आले असावेत. मुरगुडमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष रणजिसिंह पाटील यांच्या घरी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणाही बापजाद्याची पुण्याई आपल्या पाठीशी नाही. ना वडील आमदार, ना खासदार- मंत्री. एका सामान्य कुटुंबातून वर आलो आहोत. जनतेचे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर मोठा झालेला मी कार्यकर्ता आहे. हे भान मी नेहमीच माझ्या मनामध्ये ठेवलेले आहे. त्यामुळे मी कधीच माझ्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. गेली वीस-बावीस वर्षे मी मंत्री आहे. बोलण्यात, चालण्यात, वागण्यात कधीही अहंभाव दाखविला नाही आणि कधीही उतलो- मतलो नाही.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, निवडणूक म्हटली की हार-जीत आलीच. या निवडणुकीत जीवाचं रान करणाऱ्या सर्व जिगरबाज कार्यकर्त्यांचे अंतकरणापासून आभार. जे विजयी झाले आहेत त्यांचे अभिनंदन. पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून जाऊ नये, त्यांनी नव्या उमेदीने काम करावे. गडहिंग्लजची लढाई हसन मुश्रीफ विरूध्द सर्व पक्ष अशी होती. कागलमध्ये मी आणि समरजीत घाटगे एकत्र होतो. लोकशाहीमध्ये विजयी झाल्यानंतर वास्तविक पुढील पाच वर्षे आपण काय करणार आहोत. लोकांच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहोत, हे सांगायला हवे. विजयानंतर तो किती विनयाने घ्यावयाचा हे मी काल मी आणि समरजीत घाटगे यांनी दाखवून दिले आहे.
समाजकारणात आणि राजकारणात गेली ४० वर्षे मी आहे. या एवढ्या मोठ्या प्रवासात अनेकांशी संघर्ष करण्याची वेळही आपल्यावर आली. संघर्ष करीत असतानाही आपण कशा पद्धतीने बोलावयाचे तारतम्य सामाजिक काम करीत असणाऱ्या कार्यकर्त्याकडे असावे लागते. असो ते जे काही बोलले ते त्यांना लखलाभ.
गोकुळमध्ये वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव केल्याच्या आरोपावर ते म्हणाले, मी यापूर्वी अनेकदा त्यांना म्हणालो आहे ती मतपेटी गोकुळमध्ये अजूनही तशीच आहे. तुमची चार माणसे द्या, आमची चार माणसे देतो. परंतु; ते अनेक निवडणुकांमध्ये जे करतात तसं करण्याची आपली प्रवृत्ती नाही आणि आम्हाला तशी शिकवणही नाही. कारण; राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता याचे दुसरे नाव हसन मुश्रीफ आहे, असे इथे म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांची इच्छाच दिसत नाही. त्यामुळे मी, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि समरजीतसिंहराजे घाटगे एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ. मुरगुडच्या जनतेने आम्हाला मतदान केले आहे. मुरगुडच्या विकासासाठी कमी पडणार नाही. मुरगुडला मागितल्यानंतर निधीही देणार, असे ते म्हणाले. मुरगुडच्या निकालाचा अन्वयार्थ आता लगेच लागणार नाही. रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार हे आत्मचिंतन करून कुठे आणि काय चुकलं, ते शोधतील. परंतु; या निवडणुकीत चित्र विचित्र झाले. जे आमच्या जवळ होते ते दूर गेले आणि दूर होते ते जवळ आले.
संजय मंडलिक व प्रवीणसिंह पाटील यांच्या युतीबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांनी जी- जी आश्वासने दिली आहेत, ती सर्व त्यांनी पूर्ण करावीत. त्यांचा संसार सुखाचा व्हावा, याच माझ्या शुभेच्छा. नांदा सौख्यभरे........!
मंत्री श्री. मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले की संजय मंडलिक म्हणतात, कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्या अनेक आहेत. परंतु; मुरगुडचा टायगर मीच आहे. यावर बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले, इथे काय हिंस्त्र प्राण्यांचे प्रदर्शन आहे काय? नगरपालिका हे नागरिकांचे आणि शहराचे प्रश्न सोडवण्याचे माध्यम आहे. मुरगुडच्या जनतेला दिलेली वचने आणि मुरगुडच्या विकासासाठी काम करून तुमचा "टायगरपणा" सिद्ध करून दाखवा.....!
निकालानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय मंडलिक यांनी "मरू द्या....." अशी प्रतिक्रिया दिली होती. या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, विजय मिळाल्यानंतर मरायचं कशाला? अनेक निवडणुकांमध्ये ज्या प्रतिक्रिया व्हायच्या त्या झालेल्या आहेत. आतापर्यंत अनेकवेळा आमच्या कबरी खोदून झाल्या आहेत, बोटे छाटून झाली आहेत. आता ते मला मारणार आहेत की काय? असा सवालही त्यांनी केला. यावेळी रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार, रणजीत सूर्यवंशी, राजू आमते, दगडू शेणवी, डॉ. सुनील चौगुले या प्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.