

कोल्हापूर : दिवाळीपूर्वी नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण करण्याचे नियोजन करून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विविध इमारतींची कामे गतीने पूर्ण करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी अधिकार्यांना आढावा बैठकीत दिले.
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील विकास कामांबाबत मंत्री मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील रस्ते, बांधीव गटर व फुटपाथ, जमीन सपाटीकरण व सुशोभीकरण (बागकाम व पेव्हिंग ब्लॉक), बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्टचे बांधकाम, फॉरेन्सिक विभागाची इमारत, वसतिगृह, परिचारिका प्रशिक्षण केंद्र बांधकाम, विद्युत व फर्निचर काम अशा विविध कामांची माहिती घेतली.
प्रस्तावित 600 खाटांचे सामान्य रुग्णालय, 250 खाटांचे अतिविशेष उपचार रुग्णालय, कर्करोग रुग्णालयासाठी काँक्रीटचे रस्ते आदी कामांसह सीपीआर रुग्णालयातील विकासकामे जलदगतीने पूर्ण करा, असे आदेश मुश्रीफ यांनी दिले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, भाऊसाहेब हजारे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मनीष पवार उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरजू रुग्णांसाठी सीपीआर महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे. रुग्णांना चांगल्यात चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी सीपीआर परिसरातील सर्व विकासकामे जलद पूर्ण करा. उत्तूर येथील योगा सर्वोपचार केंद्र, सांगाव येथील आयुर्वेद हॉस्पिटल व पिंपळगाव येथील होमिओपॅथी हॉस्पिटल इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतीने राबवा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी विकासकामांतील अडचणींबाबत चर्चा केली. कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व महेश कांझर यांनी पूर्ण झालेल्या व प्रगतिपथावर असणार्या कामांची माहिती दिली.