

कोल्हापूर : संजय मंडलिक यांचे अज्ञान आहे. ईडीबाबत त्यांना माहिती नाही. याप्रकरणी न्यायालयातून आपली कधीच निर्दोष मुक्तता झाल्याचे सांगत समरजित घाटगे यांच्या तालुक्यात व जिल्ह्यात अनेक जमिनी आहेत. एखाद्या आरक्षण किंवा जमिनीच्या तुकड्यासाठी ते युती करणार नाहीत, असा पलटवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर केला आहे.
माजी खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यावर केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. मुळात आपल्यावर कोर्टात कोणतीही केस नाही. ज्या ईडीचा त्यांनी उल्लेख केला त्यातून आपली कधीच निर्दोष मुक्तता झाली आहे. राहीला प्रश्न समरजित घाटगे यांच्यावरील आरोपाचा. मात्र त्यांच्या इतक्या जमिनी आहेत, की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी ते कधीच युती करणार नाहीत. असे सांगून मुश्रीफ म्हणाले की, गेली 11 वर्षे आमच्या दोघांत संघर्ष झाला. या काळात तालुक्यासाठी किंवा जनतेसाठी त्यानाही काही करता आले नाही. त्यामुळे त्यानाही वाटले की हा संघर्ष संपला पाहिजे. तालुक्याचा विकास झाला पाहिजे. विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्या दहा वर्षांच्या संघर्षात 10 खून पडले, अनेकांची डोकी फुटली तरी ते एकत्र आले. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
जनता योग्य निर्णय घेईल, असे मंडलिक म्हणतात. यावर मुश्रीफ यांनी जनता नेहमीच योग्य निर्णय घेते, आताही जनतेच्या विश्वासावरच वाटचाल करतो आम्ही कोणत्याही परिस्थीतीत त्यांना याचा फायदा घेऊ देणार नाही, कारण जनता आमच्या बरोबरच आहे. जनता योग्य निर्णय घेते हे लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याचे सांगून ते म्हणाले की, मी व समरजित घाटगे यानी मंडलिक यांचा प्रचार करून त्याना चांगले मताधिक्य मिळवून दिले. तरीही ते आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला असे म्हणत असतील तर दुर्दैव आहे.
विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती सुरत लुटायची म्हणून खजिना लुटतो की खजिना लुटायचा म्हणून पैसे लुटतो आणि असा राजकीय पुढारी जनतेचा नेता कसा होऊ शकतो? असा सवालही मुश्रीफ यांनी केला.
अकरा वर्षांच्या संघर्षानंतर ही युती झाल्याचे सांगुन मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिथतीत आपली व समरजित घाटगेे यांची युती झाली. 11 वर्षांनंतर या तालुक्यात व जिल्ह्यात शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही तालुक्यातील जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी युती केली. मंडलिक यांनी उभे केलेले उमेदवार हे त्यांच्या साखर कारखान्यातील कामगार व त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्यावरही त्यांचा विश्वास नाही म्हणून ते त्यांना घेऊन गेले आहेत. मनी व मसल पॉवरचा कुठेही संबंध नाही. आपल्या सुनेच्या विरोधात ज्यांनी माघार घेतली त्या नायकवडी यांनी मुश्रीफ यांच्या कामापोटी आदर म्हणून अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
...नाही तर बात दूर दूर तक जायेगी
संजय मंडलिक यांनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर बात दूर दूर तक जायेगी, असा सल्ला देत मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीतच आपण मुरगूड व कागलचे राजकारण पाहता मंडलिक यांच्याबरोबर युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. समरजित घाटगे, संजय घाटगे व आपली युती राहील, याबाबत आपण संजय घाटगे यांच्याशी चर्चा केल्याचेही मुश्रीफ म्हणाले. संजय मंडलिक यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्याशी स्वत:ची तुलना करू नये, असेही मुश्रीफ म्हणाले.