Hasan Mushrif | डोन्ट वरी... ऑल इज ओके; मुश्रीफांचा निर्वाळा

श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपत ‘गोकुळ’चे माजी संचालक साईचरणी लिन
Gokul dairy |
Hasan Mushrif | डोन्ट वरी... ऑल इज ओके; मुश्रीफांचा निर्वाळा
Published on
Updated on

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : गेले काही दिवस सुरू असलेल्या गोकुळच्या रणसंग्रामात हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माजी संचालकांची बैठक घेऊन सोमवारपर्यंत सगळे ठीक होईल. ‘डोन्ट वरी, ऑल इज ओके’ असा निर्वाळा दिला. मुश्रीफ यांच्या निर्वाळ्यानंतर हे माजी संचालक शिर्डीला साईचरणी लिन झाले. राजकारणात टिकायचे असेल तर श्रद्धा आणि सबुरीचा हाच मंत्र जपावा लागेल, याची जाणीव त्यांना झाली आहे. भाजपला वगळून झालेल्या या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेले काही दिवस हसन मुश्रीफ विरुद्ध भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील, प्रकाश बेलवडे यांच्यात निकराचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीपासून तोडीस तोड उत्तर देत आपल्या गटाची बाजू मजबुतीने लढविली आहे. कधी विरोधकांची सगळी माहिती मला आहे. योग्य वेळी बाहेर काढेन, असा दिलेला इशारा आणि न्यायालयीन कारवाईसाठी सुरू केलेल्या हालचाली यातून हे स्पष्ट झाले. त्याचवेळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क ठेवत त्यांना आपली बाजू पटवून देण्याचा हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केला, अशी चर्चा आहे. तरीही गोकुळवरील प्रशासकाची कारवाई टळली नाही. आता पाठीशी अजित पवार नसल्यामुळे मुश्रीफ यांना जमेल तेथे आपली बाजू स्वतःच रेटावी लागत आहे. यातूनच त्यांनी आपल्या समर्थक संचालकांना विश्वासात घेतल्याची चर्चा आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेंडा पार्कातील एका इमारतीत ही अनौपचारिक बैठक पार पडली. यावेळी मुश्रीफ यांनी तुम्ही काही काळजी करू नका. सर्व काही व्यवस्थित होईल. प्रशासक काही दिवस राहणारच आहेत. मात्र आपल्याला जी लढाई करायची आहे त्यासाठी तयार राहिले पाहिजे. महायुती म्हणूनच आपण लढणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडून यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असा आश्वासक निर्वाळा या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी दिला, अशी चर्चा आहे.

त्यानंतर माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी संचालक हे शिर्डीला रवाना झाले. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून आता या आठवड्यात काय घडामोडी घडणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

एकत्र राहण्याच्या आणाभाका

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनावेळी गोकुळच्या माजी संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहायचे, अशा आणाभाका घेतल्याची चर्चा आहे. भाजपने उभे केलेले आव्हान आणि त्याला तोंड देण्यासाठी केवळ श्रद्धा आणि सबुरीची गरज असल्याचा सल्ला साईबाबांच्या शिर्डीत ज्येष्ठ संचालकांनी दिला असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news