

कागल : राज्यात सर्वाधिक मतदानाची परंपरा कागलची आहे. तीच परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील कायम राहून महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे पहिल्या फेरीतच प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागल येथे आयोजित मतदार व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. संजय चितारी यांनी स्वागत केले, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतलेले भैया माने यांनी उच्चांकी केलेल्या मतदार नोंदणीचे नेतेमंडळींनी कौतुक केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भैया माने यांनी काही वर्षापासून चंग बांधला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. भैया माने यांनी पाच जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म पद्धतीने मतदार नोंदणी केली होती, मात्र त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी केलेल्या मतदार नोंदणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली. या मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी कोल्हापूर जिल्ह्यातून झालेली आहे. जास्तीत जास्त मतदान करून डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करावे. मतदानाच्या दिवशी स्वतः मतदान केंद्रावर ठाण मांडून बसणार आहोत. पदवीधरांना दिलेली नऊ वचने डॉ. स्मिता जाधव नक्कीच पूर्ण करतील. त्या देशातील उत्कृष्ट रुग्णालय पुणे येथे चालवतात. शिक्षण संस्था कशी सांभाळावी हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. निवडून आल्यानंतर पदवीधरांचे प्रश्न त्या नक्कीच मार्गी लावतील.
बहिणीच्या पाठीमागे भैया उभे राहिले : डॉ. स्मिता जाधव
पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, भैया माने यांच्या निर्णयामुळे नात्याने मला भैया मिळाले. बहिणीच्या पाठीमागे भैया उभे राहिले हीच खरी नात्याची ताकद आहे. २५ वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये काम केले आहे. लाखो विद्यार्थ्यांना घडवले आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. पदवीधरांना न्याय आणि नोकरी देण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील यासाठी काम करणार आहे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक आणि माझे सासरे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव लोकांच्या प्रश्नाला सातत्याने न्याय मिळवून देत आले आहेत. तोच वारसा पुढे नेत आहे. घरातील स्त्रीला व्यासपीठ कसे निर्माण करता येईल हे मी दाखवून देणार आहे. मी दिलेली नऊ वचने पूर्ण करणार आहे. माझ्याकडे पोहोचण्यापेक्षा मी कसे पोहोचेल यासाठी काम करणार आहे. तीन महिन्याला संपर्क ठेवणार आहे. उत्तमातील उत्तम काम करण्यासाठी २४ तास प्रयत्नशील राहणार आहे. तालुकास्तरावर कामाचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीमध्ये खारीच्या वाट्याचे काम करीन. पदवीधर मतदारसंघातून स्त्री जिंकू शकेल असा इतिहास घडवण्याकरता मतदान करून क्रांती घडवूया, असे त्या म्हणाल्या.
आता आपली जबाबदारी वाढली : भैया माने
भैया माने म्हणाले, या निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी मिळाली. आता आपली जबाबदारी वाढली आहे. समोरासमोर लढणारे कार्यकर्ते आहोत. आतले-बाहेरचे आपल्या रक्तामध्ये नाही. डॉ. स्मिता जाधव यांच्या शिक्षणामुळे पदवीधरांचा फायदा होईल. मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी पक्षाला गालबोट लागेल, असे कोणतेही काम होणार नाही. या मेळाव्यात विवेकानंद शिक्षण समूहाचे अभयकुमार साळुंखे, विजय काळे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, गडहिंग्लजचे सिद्धार्थ बणे व इतरांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, युवराज पाटील, धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, बिपिन माने, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश सलवादे, ए. वाय. पाटील, रंजना सणगर, गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, आदिल फरास, दादासाहेब लाड, प्रकाश गाडेकर, नवल बोते, प्रवीण काळबर, सुनील माळी, सुजय जांभळे, विवेक पाटील, तालुका संघाचे अध्यक्ष बळवंतराव माने, क्रांती पाटील, भाजपचे निरीक्षक महेश सारंग, अभया दूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
जाधव आणि माने कुटुंब यांचे तीन पिढ्यांचे संबंध : भैया माने
पदवीधर मतदारसंघातून माघार घेतलेले राष्ट्रवादी पक्षाचे भैया माने म्हणाले, गेली दीड-दोन वर्षे पदवीधर मतदार नोंदणी करण्याकरता प्रचंड कष्ट घेतले. सणवार विसरून कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी केली. उमेदवारीचा निर्णय होईल असे वाटले होते, मात्र झाला नाही. त्यासाठी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज भरला. दोन दिवस त्रास झाला. ज्यांनी नोंदणी केली होती ते फोन करत होते; मात्र संघर्ष, लढाई करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कागल तालुक्यात २१ हजार मतांची नोंदणी केलेली आहे. आता आमची नाराजी दूर झाली आहे. जबाबदारीदेखील वाढली आहे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि माने कुटुंब यांचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. कौटुंबिक जिव्हाळ्याचे असलेले हे स्नेहबंध आजही मजबूत आहेत.