कोल्हापूर : सहायक निबंधक कार्यालयात ठराव सादर करताना ढकलाढकली झाली. यावरून मंत्री हसन मुश्रीफ चांगलेच संतापले. त्यांनी फोनवरून ‘गोकुळ’ प्रशासक मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे यांना, तर सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांना प्रत्यक्षात चांगलेच झापले. दोन हजार लोक येणार याची कल्पना देऊनही व्यवस्था का केली नाही, इथे बोंब व्हावी, गोंधळ उडावा, कायदा-सुव्यवस्था बिघडावी, असे तुम्हाला वाटतेय का? असा जाब त्यांनी मालगावे, ठाकरेंना विचारला. मंत्री मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांनीही ठाकरे यांना धारेवर धरले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील दूध संस्था ठरावधारकांनी गुरुवारी (दि. २५) शक्तिप्रदर्शन करत सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. यावेळी येथे उभारलेला मंडप अपुरा पडला अन् ठरावधारकांची मोठी गर्दी झाली. यामुळे गोंधळ उडाला, हे पाहून मंत्री मुश्रीफ संतापले.
शिष्टमंडळाने तुमची भेट घेऊनही तुम्ही नियोजन का केले नाही, इथे गोंधळ उडालेलाच तुम्हाला पाहायचे होते, येथील कायदा-सुव्यवस्था बिघडवायचा तुमचा उद्देश होता का, अशी विचारणा केली. तसेच, इथे लक्ष घालू नका, तुम्ही प्रशासक मंडळातून निघून गेला तर बरे होईल, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी मालगावेंना सुनावले.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रथम सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांना येथील व्यवस्थेबाबत जाब विचारला. यावर ठाकरे यांनी ‘गोकुळ’ने मंडप उभारल्याचे सांगितले. यावर मंत्री मुश्रीफ चांगलेच संतापले. त्यांनी प्रशासक मंडळ हरामखोर आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.