Harshad Murder Case | मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली चारचाकी बेळगावातून जप्त

आणखी एकाला अटक; गॅरेजमध्ये लपवलेले वाहन ताब्यात
Murder Case
Harshad Murder Case Pudhari
Published on
Updated on

चंदगड : जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयीन तरुण हर्षद याच्या प्रेमसंबंधातून झालेल्या खून प्रकरणी चंदगड पोलिसांनी गुन्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली चारचाकी बेळगाव येथील खासबाग रोडवरील एका गॅरेजमधून रविवारी (दि. ६) जप्त केली. वाहनाचा चालक निवृत्ती नागोजी शिंगाळे (वय २७, रा. नगरगाव-बांद्राईवाडा, ता. चंदगड) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

चुलत बहिणीसोबत असणाऱ्या प्रेमसंबंधांच्या रागातून कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८) आणि दिलीप ऊर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (३०) या चुलत भावांनी हर्षदच्या खुनाचा कट रचला होता. संशयित उषा नाईक हिने पार्ले येथील एका तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटवरून मेसेज करून हर्षदला रात्री जंगमहट्टीवरून पार्ले येथे बोलावून त्याचा खून करण्यात आला.

हर्षदचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कीर्तीकुमार व दिलीप यांनी स्वप्नवेल पॉईंट येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या निवृत्ती शिंगाळे व श्रीनाथ नागुर्डेकर या दोघांना गाडीसह बोलावून घेतले. या वाहनाचा वापर करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. गुन्ह्यानंतर गाडी दुरुस्तीचा बनाव करत ती बेळगावच्या गॅरेजमध्ये लपवून ठेवली होती. दरम्यान, संशयितांचे चुलते मारुती कुट्रे यांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले असून गरज भासल्यास पुन्हा चौकशीला बोलावले जाईल, असे पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले.

वाहनमालकाचा शोध सुरू

गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले वाहन चंदगड परिसरातील एका व्यक्तीच्या मालकीची असण्याची शक्यता आहे. निवृत्ती हा केवळ त्या वाहनाचा चालक म्हणून कार्यरत होता. या गुन्ह्यात अथवा कटात सहभाग आढळल्यास या वाहनाच्या मूळ मालकालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news