पाऊण लाख भाविक अंबाबाईच्या चरणी

सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली; पुढील दोन दिवस पर्यटक वाढणार
Half a million devotees at the feet of Ambabai
पाऊण लाख भाविक अंबाबाईच्या चरणीPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शाळा-महाविद्यालयांना असलेली उन्हाळी सुट्टी, दुसर्‍या शनिवारची शासकीय सुट्टी अशी पर्वणी साधत कोल्हापूरच्या भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने शनिवारी कोल्हापूर गजबजले. शनिवारी दिवसभरात 75 हजारांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली, तर शहर व जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही गर्दीने फुलून गेली.

गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी सुरू आहे. त्यात सलग सुट्टी आली की सहकुटुंब पर्यटनासाठी कोल्हापूरला पसंती दिली जाते. शनिवारी कोल्हापुरात पर्यटकांच्या गर्दीने पुन्हा हीच प्रचिती दिली. शुक्रवारी रात्रीपासूनच कोल्हापुरात पर्यटक मुक्कामाला आले होते. शनिवारी पहाटेच अंबाबाईच्या दर्शनासाठी मुख्य दर्शन मंडपासह मुख दर्शन व अभिषेक मंडपातही गर्दी होती. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध— प्रदेश येथून मोठया संख्येने पर्यटकांनी शनिवारी कोल्हापुरात पर्यटनाचा आनंद घेतला.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही फुलली

अंबाबाई दर्शनानंतर शहरातील न्यू पॅलेस, टाऊन हॉल म्युझियम, रंकाळा तलाव, शाहू समाधिस्थळ, शाहू महाराज जन्मस्थळ यांसह जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, काळम्मावाडी, कणेरी मठ, नृसिंहवाडी, खिद्रापूर, कात्यायनी मंदिर येथेही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

पुढील दोन दिवसही कोल्हापूर पॅक

रविवार व सोमवारी बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने दोन दिवस कोल्हापूर पॅक असणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून यात्री निवास, होम स्टे, फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल्स येथील बुकिंग फुल्ल झाले आहे. येत्या दोन दिवसांतही सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

पर्यटकांच्या सुविधांना प्राधान्य आवश्यक

सलग सुट्टीच्या काळात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे. वाहतुकीचे नियोजन, पार्किंगस्थळ परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणांमुळे होणारी गैरसोय, पर्यटनस्थळ परिसरातील स्वच्छतागृहांचा अभाव हे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक नियंत्रण आणि देवस्थान व्यवस्थापन या प्रशासनाने समन्वय साधण्याची गरज आहे.

खरेदीलाही बूस्ट, खवय्येगिरीला प्रतिसाद

परगावाहून येणार्‍या पर्यटकांकडून कोल्हापूरच्या खासियत असलेल्या पदार्थ, वस्तू आवर्जून खरेदी केल्या जातात. यामुळे पर्यटनाच्या हंगामात खरेदीलाही बूस्ट मिळत आहे. शनिवारी आलेले पर्यटक इमिटेशन ज्वेलरी, मसाले, कांदा, लसूण चटणी, गूळ, कोल्हापुरी चप्पल उत्साहात खरेदी करताना दिसत होते. तसेच कोल्हापूरची खाद्यसंस्कृती असलेल्या मटण, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, दूधसार या पदार्थांनाही पर्यटकांची पसंती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news