

कोल्हापूर : कर्नाटकातून सांगली, सातारा जिल्ह्यांत गुटख्याची तस्करी करणार्या रुई (ता. हातकणंगले) येथील तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या. रवींद्र वसंत पाटील (वय 33) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर बुधले मंगल कार्यालयासमोर सापळा रचून कारवाई करण्यात आली.
जप्त गुटखा कोणाकडून व कोणासाठी घेण्यात आला होता, याची चौकशी संशयिताकडे करण्यात येत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. रुई येथील रवींद्र पाटील हा निपाणी परिसरातून पुणे-बंगळूर महामार्गावरून सांगलीसह सातारा जिल्ह्याकडे गुटखा तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे यांचे पथक संशयिताच्या हालचालीवर नजर ठेवून होते.
रविवारी सायंकाळी टेम्पोतून गुटखा तस्करी होत असल्याचे समजताच पथकाने महामार्गावर सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला. झडतीत 3 लाख 10 हजारांचा गुटखा व 5 लाख 50 हजारांचा टेम्पो असा 8 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित रवींद्र पाटील याच्याविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.