

मनोजकुमार शिंदे
दानोळी : शिरोळ तालुक्यातील कवठेेसार येथे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस दलाने संयुक्त मोहीम राबवून गुटखा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. येथील अडगुळे मळा परिसरातील एका शेडमध्ये गुटखा तयार करण्याचे यंत्र व मोठा कूलर जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुटखा तयार करण्याचे यंत्र आळते (ता. हातकणंगले) येथील गुटखा माफियांशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पथकाने नदीकाठी असलेल्या महेश महादेव अडगुळे यांच्या शेतातील खोलीत छापा टाकला असता तिथे गुटख्याचा वास दरवळत होता. अन्न व औषध प्रशासनाचे पुणे येथील अधिकारी व्ही. व्ही. शिंदे यांनी पाहणी करून येथे गुटखा उत्पादन सुरू असल्याचे स्पष्ट केले. वारणा काठावरील या मळ्याचे कनेक्शन शेजारील सांगली जिल्ह्याशीही जोडले गेल्याची चर्चा आहे.
या कारवाईत सांगली विभागाचे नीलेश मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्यासह जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे जालंदर पाटील, जावेद आबेकरी, प्रवीण जाधव यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलिसपाटील प्रशांत नेजकर उपस्थित होते.
पोलिस नेमके काय करतात?
दानोळी येथील खुनाच्या घटनेत पोलिस तपासात झालेली दिरंगाई आणि आता कवठेसारसारख्या ग्रामीण भागात बिनदिक्कतपणे सुरू असलेले गुटखा उत्पादन यामुळे स्थानिक प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे. पोलिस नेमके करतात तरी काय, असा सवालही उपस्थित होत आहे.