

कोल्हापूर : महापालिकेतील एका ठरावाच्या आधारे तावडे हॉटेल परिसरातील २०४ बेकायदेशीर बांधकामांची अतिक्रमणे नियमित करण्याचा डाव केला आहे. त्यात महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रवीण केसरकर व सुभाष बुचडे यांचे संगनमत आहे, असा गंभीर सर्वपक्षीय कृती समितीचे ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी गुरुवारी (दि. १८) पत्रकार परिषदेत केला.
उपसूचनेतून डाव साधण्याचा प्रयत्न
गोरगरिबांची घरांच्या गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेत १८ मार्च २०२६ रोजी एक ठराव करण्यात आला. त्यात नगरसेवक केसरकर व बुचडे यांनी उपसूचना दाखल केली. गुंठेवारी नियमितकरण फाईल जमा करून घेताना कोल्हापूर शहरातील बहुतांशी नागरिकांनी शेती विकास विभाग किंवा आरक्षित जागेमध्ये गुंठेवारी अंतर्गत नियमानुसार ३१ डिसेंबर २०१० पूर्वी खरेदीपत्र व बांधकामे झालेली आहेत, अशी प्रकरणेदेखील जमा करून घ्यावीत. या जमिनीवरील गुंठेवारी नियमितीकरण मंजूर करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा, असे उपसूचनेत म्हटले आहे.
सर्वानुमते उपसूचना मंजूर करण्यात आली असून, प्रस्तावावर सर्व प्रशासकीय अधिकारी आणि वरील सर्वांच्या स्वाक्षरी आहेत. याच ठरावाच्या आधारे तावडे हॉटेल परिसरातील मिळकतधारकांनी गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत महापालिकेने बजावलेली नोटीस तूर्त स्थगित ठेवावी, अशी मागणी अतिक्रमणधारकाने केली असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अशोक भंडारे, अनिल कदम, अभिजित कांबळे, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.
सुनील मोदी यांनी व्हिडीओ व्हायरल करावा
काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी महापालिका सभेत गांधीनगरवाल्यांबरोबर कोण, कुठे भेटून चर्चा करतोय याचा माझ्याकडे व्हिडीओ असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या हितासाठी त्यांनी तो व्हिडीओ व्हायरल करावा. सेटलमेंट करणाऱ्यांची नावे जाहीर करावी, अशी विनंतीही कृती समितीने केली; अन्यथा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी मोदी यांचा राजीनामा घेण्याचे आवाहनही केले.
भाजप-शिवसेनेने भूमिका जाहीर करावी
सभागृहात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे पाडावीत, असे म्हणतात. परंतु, भाजपचे आमदार अमल महाडिक ती अतिक्रमणे नियमित करावीत म्हणून शासनाकडे प्रयत्न करत आहेत. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमितीकरण करण्याची कार्यवाही करावी म्हणून शेरा मारला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी कृती समितीने केली.