बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींना वन विभागाकडून लवकरच मदत : पालकमंत्री आबिटकर

सीपीआरमध्ये घेतली जखमींची भेट
Guardian-Minister-Prakash-Abitkar-Visits-Injured-At-CPR-Hospital-In-Kolhapur
कोल्हापूर : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची सीपीआर रुग्णालयात गुरुवारी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. अजित लोकरे, डॉ. गिरीश कांबळे, आरोग्यदूत बंटी सावंत आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरात मंगळवारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना वन विभागाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. गुरुवारी आबिटकर यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली.

शहराच्या मध्यवस्तीत नागाळा पार्क परिसरात मंगळवारी बिबट्या शिरला होता. या बिबट्याने चौघांवर हल्ला केला. यामध्ये जखमी झालेले माळी तुकाराम खोंदळ आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. आबिटकर यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

पाटील आणि खोंदळ यांच्याकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी बिबट्याला कसा प्रतिकार केला. त्याने केलेला हल्ला कसा परतवला, त्याचा थरार सांगितला. त्यावर धोक्याच्या परिस्थितीतही तुम्ही दाखविलेली तत्परता आणि धाडस कौतुकास्पदच असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. यानंतर त्यांनी बिबट्याच्या हालचाली, हल्ल्याची पार्श्वभूमी आणि घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादाची सविस्तर माहिती घेतली.

जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचीही त्यांनी माहिती घेतली. यानंतर या जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना केल्या. या दोन्ही जखमींच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवा, उपचारादरम्यान सर्व दक्षता घ्या, उपचारात कोणत्या उणिवा राहू देऊ नका, असेही आदेश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. गिरीश कांबळे, आरोग्यदूत बंटी सावंत आदींसह वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

वन अधिकार्‍यांची लवकर बैठक

यानंतर बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, शहरात आणि परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news