कोल्हापूर : ‘क्रेरडाई’ने मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. हॉटेल अयोध्या येथे क्रिडाईच्या पदाधिकार्यांसमवेत त्यांनी बैठक घेतली. यावेळी तिसरा शहर विकास आराखडाही मंजूर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
क्रेरडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले, व्यावसायिक कामकाज करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमात सुधारणा करावी. कलम 20 अन्वये मुख्यमंत्री कोट्यातील पाच टक्के घरे विक्रीची परवानगी द्यावी, नगररचना विभागातील रिक्त पदे भरा, शहराचा विकास आराखडा वेळेत मंजूर करा, शासनाच्या सर्व नव्या इमारतींना निधी द्या. मंजूर डी.पी. रस्ते विकसित करून त्याला टीडीआर व एफएसआय देण्याची तरतूद करा. शहराची हद्दवाढ करा.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शहर विकासात क्रेरडाईचे मोलाचे योगदान आहे. क्रेरडाईने वेळोवेळी लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे. कोरोना काळ व महापुरावेळी केलेली मदत सर्वांना ज्ञात आहे. गेली एक वर्ष मी पालकमंत्री म्हणून आपले सर्व विषय समजून घेऊन न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. या सर्व मागण्या नगरविकास विभागाशी निगडित आहे, त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची मदत मिळणार आहेच तसेच नगरविकासमध्ये त्यांची मास्टर की आहे. या विभागाचे मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभणार आहे.
महापालिका स्तरावरील प्रश्नांची बैठक घेऊन सोडवणूक स्थानिक पातळीवर केली जाईल, धोरणात्मक निर्णयासाठी शासन स्तरावर आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेतली जाईल, असे सांगत आबिटकर म्हणाले, शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ते दर्जेदार करणे, फ्लाय ओव्हरची बांधणी, खुल्या जागांचा विकास याबरोबरच शहराचा रखडलेला विकास आराखडा मंजूर केला जाईल. प्रस्तावित डी. पी. रोड विकसित करून टी.डी.आर., वाढीव एफ.एस.आय. देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पूर्ण वेळ सहायक नगररचनाकार पदासह सर्व रिक्त पदांची भरती केली जाईल. महापालिका कामकाजात गतिमानता आणून शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अशा बैठका वेळोवेळी आयोजित कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर विकास प्राधिकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामध्ये समाविष्ट गावांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. त्या कामाची गती वाढविणेसाठी स्थानिक आमदार यांचे समवेत एकत्रित रित्या काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध शहरे पुढे जाताना कोल्हापूर मात्र आजही एखादे मोठे खेडे आहे असे वाटते, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासाची आमची जबाबदारी आहे, ती सर्वांच्या मदतीने व सहकार्याने पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बैठकीला क्रेरडाई राज्य उपाध्यक्ष विद्यानंद बेडकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, रत्नेश शिरोळकर, जयेश भाई ओसवाल, कृष्णा पाटील, सुजय होसमणी, संग्राम दळवी, सचिन ओसवाल, महेश यादव, गौतम परमार, अजय डोईजड, अण्णासाहेब अथने, आदित्य बिडकर, नितीन पाटील, प्रतीक पाटील, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते.