Prakash Abitkar | शहरातील डीपी रोड, रिंग रोड खुले करा

पालकमंत्री आबिटकर यांचे आदेश : तावडे हॉटेल - शिवाजी पूल फ्लायओव्हरचा प्रस्ताव तीन आठवड्यांत सादर करण्याची सूचना
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी उपस्थित खासदार शाहू महाराज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक आदींसह अधिकारी.
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी उपस्थित खासदार शाहू महाराज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक आदींसह अधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर : टीडीआर आणि शहरातील डीपी रोड, रिंग रोड १५ दिवसांत खुले करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला दिले. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या फ्लायओव्हरचा प्रस्ताव त्रुटी दूर करून, सूचनांचा समावेश करून तीन आठवड्यांत केंद्र शासनाला सादर करा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात या फ्लायओव्हरचे सादरीकरण झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दाभोळकर कॉर्नर येथून राजारामपुरीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईनवरून उड्डाणपूलच उभारा, अशी सूचना केली. त्यानुसार मुख्य फ्लायओव्हरच्या प्रस्तावात या कामाचाही समावेश करून तसा अंतिम आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला.

शहरातील डीपी रोड असोत, रिंग रोड असोत किंवा कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विकसित करता येणारे रस्ते असोत, हे सर्व मार्ग प्रत्यक्षात खुले झाल्याशिवाय कोल्हापूरकरांना खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येणार नाही, असे सांगत आबिटकर म्हणाले, टीडीआरचा एक घोटाळा झाला, त्याचे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार आहोत? यामुळे शहराचे नाव खराब झाले आहे. आता सकारात्मक भूमिका घ्या आणि पंधरा दिवसांत डीपी रोड, रिंग रोड खुले करा. त्याचा आराखडा तयार करा. खुल्या जागा ताब्यात घ्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या. दरम्‍यान, या प्रकल्‍पासाठी १३ हेक्‍टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्‍यापैकी ८ हेक्‍टर जमीन पूररेषेतील आहे.

प्रस्तावित उड्डाणपूल कोल्हापूरची ओळख बनेल : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर शहरासाठी अत्यंत महत्त्‍वाचा प्रस्ता‍वित तावडे हॉटेल-शिवाजी पूल-फुलेवाडी रिंगरोड हा सुमारे १० कि.मी.चा उड्डाणपूल भविष्यात कोल्हापूरची ओळख बनेल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रस्तावित उड्डाणपुलाचे सादरीकरण झाले.

आबिटकर म्हणाले, शहराच्या विकासासाठी रस्त्यांची सुधारणा व पार्किंगची सोय अत्यंत महत्त्‍वाची आहे. त्यासाठी शहरातील मोकळ्या जागा यांची महापालिकेने निश्चिती करून प्रस्ताव तयार करावा. अंबाबाईच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी रस्ते व इतर विकासाचे प्रस्ताव तयार करा. शहरात वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी डीपीआर तयार करताना पुढील २५ ते ३० वर्षांच्या कालावधीचा विचार करून प्रस्ताव तयार करावा, त्यासाठी तांत्रिक माहिती, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही प्रस्तावात समोवश करा.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शहरासाठी प्रस्तावित असलेला उड्डणपुलाचा प्रस्ताव तयार करताना शहरातील वाहतुकीची कोंडी फुटावी यासाठी ठिकठिकाणी सेवा मार्ग उपलब्ध करून द्यावेत. पुलाचा डीपीआर तयार करत असताना ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे. खासदार शाहू महाराज म्हणाले, शहराच्‍या विकासासाठी करण्यात येणारा डीपीआर करण्यापूर्वी इंदूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामे केली आहेत त्याचेही अवलोकन करावे.

यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते, नगरसेवक शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, अभिजित खतकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदींसह अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news