

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या 595 कोटींच्या सुधारित विकास आराखड्यामुळे सुलभ दर्शन व्यवस्थेबरोबरच संपूर्ण परिसराचे नागरी व आर्थिक विस्तारीकरण होणार आहे. प्रस्तावित कामांमुळे रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात वाढ होऊन स्थानिकांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या विकासामुळे परिसरातील रहिवासी क्षेत्र सध्या असलेल्या 1 लाख 95 हजार 217 स्क्वेअर फुटांवरून आणखी 48 हजार 804 स्क्वेअर फुटांनी वाढणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रातही 31 हजार 751 स्क्वेअर फुटांची वाढ अपेक्षित आहे. परिणामी अंबाबाई मंदिर परिसर हा धार्मिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही अधिक बळकट केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
या प्रकल्पासाठी नव्या बांधकाम व फर्निचरसाठी 453 कोटी 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वीज व अग्निशमन सुविधांसाठीही स्वतंत्र निधी राखीव आहे.
वाहनतळाच्या सुविधांनाही महत्त्व देण्यात आले आहे. महाद्वार रोडकडे शॉपिंग प्लाझासह पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. तसेच बिंदू चौक परिसरात भव्य वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे. या आराखड्यात राजाराम व जोतिबा रोडचे 9 मीटर, तर महाद्वार रोडचे 19 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्ते, दर्शन मंडप, सुसज्ज पार्किंग, दुकाने, पोलिस स्टेशन आणि इतर मूलभूत सुविधांसह सुमारे 10.95 लाख स्क्वेअर फूट बांधकाम प्रस्तावित आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीपासून 10 मीटर परिघातील टप्प्याटप्प्याने होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेनंतर हा बदल होणार आहे.