

कोल्हापूर : कोट्यवधीच्या घोटाळ्यामुळे बुडालेल्या ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेससह संलग्न चार कंपन्यांचा मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याच्या फरार असलेल्या मेहुण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने बेळगावात अटक केली. सोमनाथ मधुसूदन कोळी (36, रा. दौलतनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. सोमनाथवरील कारवाईमुळे अटक झालेल्या संशयितांची संख्या वीसवर पोहोचली आहे.
ग्रोबझ ट्रेडिंग सव्हिसेससह संलग्न चारही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 10 महिन्यांत 15 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने सूत्रधार विश्वास कोळीसह कंपनीच्या भागीदारासह एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. सूत्रधार कोळीचा मेहुणा सोमनाथ कोळी हा पोलिसांना चकवा देत तीन वर्षांपासून फरारी राहिला आहे. संशयिताच्या अटकेसाठी विशेष पथकाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकात छापेमारी केली. पण त्याचा सुगावा लागत नव्हता. कोळीने बंगळूर येथे वास्तव्य केल्याची माहिती चौकशीत निष्पन्न झाली होती.
तो बेळगावला आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, जालिंदर जाधव यांच्या पथकाने बेळगाव येथे छापेमारी करून त्यास ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात त्याला पहाटे कोल्हापूर येथे आणण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.