

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.19) पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अभिवादन केले. भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथील डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली.
‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांचा मंगळवारी (दि. 20) स्मृतिदिन आहे. अभिवादन, स्केटिंग रॅली आदींसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक आहे. या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सायंकाळीच ‘पुढारी’ भवन येथे येऊन डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी कल्याणराव निकम, राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण जाधव, ऐनीचे माजी सरपंच संजय पाटील, अरविंद पाटील आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
विधान परिषदेच काँग्रेसचे गटनेते, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनीही सोमवारी सायंकाळीच डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, राहुल माने, सुभाष बुचडे, रियाज सुभेदार, राजू साबळे, अक्षय शेळके, उमेश पाडळकर, रोहित गाडीवडर, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिननिमित्त मंगळवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. दैनिक ‘पुढारी’, पुढारी भवन, भाऊसिंगजी रोड येथे सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.