

कोल्हापूर : चैनीसाठी आजीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवत नातवानेच चहामधून विषारी द्रव्य देऊन आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ऋणमुक्तेश्वर परिसरातील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये सोमवारी (दि. 16) संशयास्पद मृत्यू झालेल्या उषा मारुती भिऊंगडे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी प्रेम परशुराम भिऊंगडे (20, रा. ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी रिंग रोड) याला अटक केली. त्याने दहा तोळे दागिने लुटल्याची व खुनाची कबुली दिली आहे. मुलाने केलेल्या खुनामुळे वडील परशुराम यांना मानसिक धक्का बसला आहे.
उषा भिऊंगडे यांच्या पतीचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे येथील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात. फुलेवाडी येथे राहणारा त्यांचा पुतण्या परशुराम भिऊंगडे हे उषा यांची देखभाल करत होते. रविवारी (दि. 15) रात्री परशुराम उषा यांना औषध देऊन गेले होते. सोमवारी सकाळी बाहेरगावी गेल्याने ते फ्लॅटवर आले नव्हते. त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास उषा यांना फोन केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परशुराम यांनी बाजूच्या फ्लॅटधारकांना फोन करून चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी बेडरूममध्ये जाऊन पहिले असता उषा निपचित पडल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना याची माहिती दिली. बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा व्हिसेरा तपासणीला पाठविला होता.
उषा भिऊंगडे काही दिवसांपासून आजारी होत्या. यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्रथमदर्शनी होता. पण त्यांचे दागिने गायब होते. फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवला होता. तांत्रिक माहिती गोळा करताना उषा भिऊंगडे यांचा नातू प्रेम सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास फ्लॅटमध्ये आला होता. अर्ध्या तासानंतर तो निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रेमला घरातून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर खुनाची कबुली दिली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह रूपेश माने, अमित सर्जे, अरविंद पाटील, हंबीरराव अतिग््रेा, राजेश राठोड, सागर चौगले यांनी या घटनेचा तपास केला.
खुनानंतर विद्यापीठात
आजीचा खून करून प्रेम दुचाकीवरून विद्यापीठात गेला. तेथे काही मित्र-मैत्रिणींना भेटला. तो शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात आर्टस्च्या द्वितीय वर्षात तो शिक्षण घेतो. तो वडिलांना सोनारकामामध्ये मदत करत होता.
पोलिस पाहून पळ काढला
साधारण 11च्या सुमारास परशुराम भिऊंगडे यांनी प्रेमला फोन केला आणि आजी मृत झाल्याची माहिती दिली. यानंतर प्रेम घटनास्थळी आला. सुमारे अर्धा तास तो याच ठिकाणी थांबला. मात्र पोलिसांच्या भीतीने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घरी येऊन त्याने फोन स्विच ऑफ केला. कपडे बॅगेत भरून कोकणात मित्रांसोबत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मोटार घेऊन तो एकटाचा कोकणात फिरत राहिला. 16 फेबुवारीला बाहेर पडलेला प्रेम 19 तारखेला घरी परतला.