Shivrajyabhishek Day | शिवराज्याभिषेकदिन सोहळ्‍याची पारंपरिक साजात भव्य मिरवणूक

मराठा महासंघातर्फे लोकोत्सव म्हणून साजरा; प्रबोधनात्मक फलकांनी लक्ष वेधले
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्या मिरवणुकीचे उद्‌घाटनप्रसंगी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, वसंतराव मुळीक, ॲड. धनंजय पठाडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला.
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्या मिरवणुकीचे उद्‌घाटनप्रसंगी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, वसंतराव मुळीक, ॲड. धनंजय पठाडे आदी. दुसऱ्या छायाचित्रात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला. ( छाया : नाज ट्रेनर )
Published on
Updated on

कोल्हापूर : धनगरी ढोल आणि लेझीम... हलगीच्या कडकडाटावर भिरभिरणारी लाठी आणि सळसणारी तलवार... टाळ-मृदंगचा निनाद... गजराजावर विराजमान युगपुरुष शिवराय... सोबतच बाल शिवाजी, जिजाऊ अन्‌ घोडेस्वार मावळे आणि शिवरायांचा अखंड जयघोष... अशा ऐतिहासिक वातावरणात शनिवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीचे फुलांच्या पायघड्या घालून जागोजागी जल्लोषी स्वागत करण्यात आले. संपूर्ण मार्गावर छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू होता. मिरवणुकीतील छत्रपतींच्या इतिहासासोबतच ताराराणींचा पराक्रम, चला जागृत होऊया... स्वच्छ, सुंदर कोल्हापूरसाठी संकल्प करूया, महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, जातिभेद गाडा... भारत देश जोडा, छत्रपती शिवाजी महाराज व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेतील शक्ती व भक्तीत संगम अशा विषयांवरील समाजप्रबोधनात्मक लक्षवेधी फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मार्गावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.

मराठा महासंघाच्या मंगळवार पेठेतील कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. खासदार शाहू महाराज, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ विधितज्ज्ञ धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, अजित सासने, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, मल्हार सेने बबनराव रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, शंकरराव शेळके, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, अनुराधा मुळीक, संग्राम पाटील, मिलिंद सावंत, अशोकराव भंडारे, शंकरराव पाटील, महेश मछले, दत्ता बोडके, किरण चव्हाण, अशोक पोवार, सुनील माने, राजेश वरक यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांची मोठी उपस्थिती

शिवराज्याभिषेक मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. भगव्या साडी आणि फेटे परिधान करून महिलांनी हलगीच्या ठेक्यावर लेझीमचा ताल धरला. धनगरी ढोल, राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी मावळे वेशभूषेतील घोडेस्वार आणि छत्रपती शिवरायांची सिंहसनावर आरूढ झालेली मूर्ती अशी आकर्षक मिरवणूक शहरातून निघाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news