

शिरढोण : ज्ञान ही अनुभवातून समृद्ध होणारी प्रक्रिया आहे. माणसाला वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे. साहित्य माणसाला काळाचे भान देते, संवेदनशील बनवते आणि परिवर्तनाची प्रेरणा देते. त्यामुळे वाचन संस्कृती जपणे आणि ती अधिक व्यापक करणे काळाची गरज आहे. समाजात नवपरिवर्तन घडवायचे असेल तर दर्जेदार साहित्याचे वाचन आणि साहित्यिकांनी आशयपूर्ण लेखन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रदीप पाटील (ईश्वरपूर) यांनी केले.
शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १२ वे ‘संवाद’ ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाची सुरुवात सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या उद्घाटनाने झाली. गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.
संमेलनाच्या प्रास्ताविकात संयोजन समिती अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी गेल्या बारा वर्षांत संमेलनाने ग्रामीण साहित्य चळवळीस दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. दुपारच्या सत्रात प्रा. शांतिनाथ मांगले व मारुती मांगोरे यांनी ग्रामीण जीवनातील वास्तव, दुःख-सुख मांडणारे कथाकथन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संमेलनात विकास शिंगे यांना शिरढोण भूषण पुरस्कार, वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य पुरस्कार तर डॉ. सुनील पाटील यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी भारत सातपुते, मनोहर भोसले व रंगराव बन्ने यांना स्व. पारिसा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीपती कांबळे यांच्या ‘निवृत्ताच्या कविता’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
समारोपाच्या सत्रात कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यावेळी मनोहर भोसले, माणिक नागावे, शशिकांत मुद्दापुरे, संजय सुतार, अविनाश सगरे, शिवाजी गायकवाड, विजय पोवार, रंगराव बन्ने, श्रीपती कांबळे आदी कवींनी कविता सादर केल्या.
संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्वास बालीघाटे, डॉ. कुमार पाटील, महावीर कांबळे, संजय मालगांवे, विलास चौगुले, जगन्नाथ बिरोजे, संतोष सैसाले, लता काकडे, कमल बिरोजे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानले.