

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघ निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकानंतर एक-दोन महिन्यांतच जिल्ह्यातील 456 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे 456 ग्रामपंचायतींची मुदत फेब—ुवारी 2026 पर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायतीसाठी तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला येत्या दीड-दोन महिन्यांत सुरुवात होईल अशी शक्यता आहे.
न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सुमारे 44 टक्के ग्रामपंचायतींचीही निवडणूक लागणार असल्याने येत्या तीन-चार महिन्यांत ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. गावागावात त्याची आतापासूनच तयारीही सुरू झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होईल, अशी शक्यता आहे. तत्पूर्वी पुढील वर्षी जानेवारी-फेब—ुवारीदरम्यान होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रभाग रचना सुरू होईल, अशीही शक्यता आहे.
गावातील सत्ता केंद्र आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षासह स्थानिक गटा-तटांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने अनेकांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सोपी होणार आहे. त्यानुसारच आतापासूनच आखाडे बांधले जात आहेत.
जिल्ह्यातील 1,026 ग्रा.पं.ची सरपंचपदाची सोडत सोमवारी काढण्यात आली. यापूर्वी दोन वेळा सोडत काढली होती. त्यानंतरही अनेक गावांत सरपंचपद पहिल्या सोडतीप्रमाणेच कायम राहिले आहे. सुमारे 124 गावांत यापूर्वी काढलेल्या सोडतीत बदल झाला आहे. सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी अरक्षित झाले आहे, त्यानुसार गावागावात आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सरपंचपदासाठी उमेदवार निश्चितीपासून पॅनेल तयार करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.