

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी गोविंद बाबुराव गावडे याने सलग आठ तास 25 मिनिटे तबला वाजवण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद ‘ग्लोबल व एशिया-पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाल्याचे निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांनी जाहीर केले. विवेकानंद कॉलेजच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवनात सोमवारी (दि. 11) सकाळी आठ वाजता आंबोलीचे माजी सरपंच प्रकाश गवस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दिवसभर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गोविंदला प्रोत्साहन दिले.
विक्रमाची नोंद ‘ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘एशिया-पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सत्यजित कदम व प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या हस्ते गोविंदचा गौरव करण्यात आला. प्राचार्य गावडे यांनी गोविंदच्या शिक्षण, खेळ आणि कलेतील प्रावीण्याचा गौरव केला. सत्यजित कदम यांनी हा विक्रम शाहूरायांच्या कलानगरीची ओळख वाढवणारा असल्याचे नमूद केले. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ‘ज्ञान, विज्ञानाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था सदैव तत्पर असते,’ असे सांगत गोविंदच्या यशाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला रत्नागिरीचे आयएएस अधिकारी प्रकाश गावडे, सावंतवाडीचे तलाठी संजय गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गोविंद गावडे हा केवळ तीन महिन्यांचा असताना बाबुराव गावडे व सविता गावडे यांनी अनाथाश्रमातून दत्तक घेतला. ‘समाजासाठी काहीतरी देणे लागतो’ या विचारातून त्यांनी गोविंदचे संगोपन केले आणि त्याला शिक्षण, खेळ व कलेत घडवून समाजात वेगळे स्थान मिळवून दिले. गोविंदचा हा विक्रम केवळ कला नव्हे, तर माणुसकीचा संदेशही देणारा ठरला आहे.