

कोल्हापूर : मी सहा वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल शिकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर, तंजावर, जिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिली होती हे ऐकून अभिमान वाटला. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी आज येथे सी. पी. राधाकृष्णन म्हणून उभा नसतो. कोणत्या तरी वेगळ्या नावाने माझी ओळख असती, असे वक्तव्य राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राधाकृष्णन म्हणाले, सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हा स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानात झाला. स्वातंत्र्यानंतर सरकारांनी त्याची?अंमलबजावणी आपल्या?धोरणांत केली. हे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे मोठेपण आहे. शिवाजी विद्यापीठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. मी सहा वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र ऐकले. त्यांचे बंधू व्यंकोजी हे तंजावरला होते. त्यामुळे महाराजांनी वेल्लोर, तंजावर, जिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिली होती याचा अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज मी तुमच्यासमोर सी. पी. राधाकृष्णन म्हणून उभा नसतो. कोणते तरी वेगळे नाव मला असते. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे राजे नव्हते तर ते अखंड भारताचे महाराजे होते, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य पराक्रम व जीवनकार्याचा गौरव केला.