

कोल्हापूर : कोल्हापुरातील नियोजित शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाट्याला घोषणांचा पाऊस आला आहे. या महाविद्यालयासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शेंडा पार्क येथील जागेचा प्रस्ताव पाठविला होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या समारंभात दंत महाविद्यालय कागल येथे स्थापन करण्याची घोषणा केली आणि आता हे महाविद्यालय गडहिंग्लजमध्ये सुरू करण्याची त्यांनी घोषणा केली. यामुळे प्रस्तावित शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाची जागेसाठी सध्या भ्रमंती सुरू आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची मांदियाळी झाली आहे. अनेक वर्षे त्याची आवश्यकता होती. परंतु, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकीय चष्म्यातून त्याकडे पाहिले गेले. परिणामी आज राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपुढे शिक्षकांची गंभीर समस्या उभी राहिली आहे. जाहिराती देऊनही शासनाला शिक्षक मिळत नाहीत आणि कंत्राटी पद्धतीवर नियुक्त्या करावयाच्या झाल्या, तर 11 महिन्यांच्या नियुक्तीसाठी एका महिन्याचे लक्ष्मीदर्शन केल्याशिवाय हातात ऑर्डर पडत नाही, अशी अवस्था झाल्याने बुद्धिजीवी डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठ फिरविणे पसंत केले आहे. यामुळेच राज्यातील नव्याने मंजूर झालेल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांतील 200 शिक्षकांची उसनवारी केल्याची माहिती शासनानेच माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता, जेणेकरून पायाभूत सुविधांवर खर्च कमी होईल. आवश्यक शिक्षकांची संख्या कमी करता येईल आणि दंत वैद्यकीय शिक्षणाचे पदवीधरही दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडतील, अशी यामागील भूमिका होती. तथापि, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना नवे दंत वैद्यकीय महाविद्यालय मतदारसंघात उभे करावयाचे आहे. त्यासाठी जागा उपलब्ध होईल. पण महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सुमारे 150 शिक्षकांचा ताफा उपलब्ध कसा करणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. कारण जागेच्या प्रश्नावरूनच कोल्हापूरचे वैद्यकीय महाविद्यालय 50 वर्षे लटकले होते. आता शिक्षकांच्या प्रश्नावरून दंत वैद्यकीय महाविद्यालयाची परवड नाकारता येत नाही.
स्वतंत्र दंत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जेवढा निधी लागतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी निधी अशा संलग्न दंत वैद्यकीय महाविद्यालयांना पुरेसा ठरू शकतो, याचा अभ्यास केंद्रीय पातळीवर झाला होता. कारण वैद्यकीय महाविद्यालये आणि दंत वैद्यकीय महाविद्यालये यांच्यामध्ये अभ्यासाचे विषय आणि सुविधा बर्याच समान आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या परिभाषेत ‘प्री’ आणि ‘पॅरा’ मेडिकल सिलॅबस म्हणून ओळखल्या जाणार्या अॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, मायक्रो बायोलॉजी, पॅथालॉजी, फार्माकॉलॉजी व बायोकेमिस्ट्री हे सहा विषय समान आहेत. या विषयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी वापरल्या जाऊ शकतात. ग्रंथालय आणि सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅनसारखी उपकरणे उपयोगात आणली जाऊ शकतात. शिक्षक वर्गाचाही उपयोग होतो.
वैद्यकीय महाविद्यालयाला 500 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय ही अट असल्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णही तपासता येऊ शकतात. यामुळे संलग्न दंत वैद्यकीय महाविद्यालयाचा खर्च 60 टक्क्यांपेक्षा कमी होतो. परंतु, संबंधित रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच असणे आवश्यक आहे. एवढी बाब स्पष्ट असताना महाविद्यालयाची जागेसाठी कागल आणि नंतर गडहिंग्लजची घोषणा कशी होते?