

सांगरूळ : करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे अज्ञातांनी वाटेत अडवून सराफ व्यावसायिकाला पिस्तूलच्या धाकाने हातपाय बांधून सहा तोळे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. श्री लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक तेजस माळी (सुंदेशा) यांनी याबाबत करवीर पोलिसांत तक्रार दिली आहे.
तेजस रात्री कोल्हापूरला घरी जाण्यासाठी निघाले होते. विलास कॉर्नर परिसरात पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. यावेळी हल्लेखोर आणि तेजस यांच्यात झटापट झाली. दरम्यान, दबा धरून बसलेल्या त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी तेजस यांना शेतात नेऊन हातपाय बांधून, तोंडात गोळा कोंबून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटले. तेजस यांची दुचाकी काही अंतरावर सोडून दिली तसेच मोबाईलही फेकून दिला.
तेजस रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने पुतणे लक्ष्मण माळी, अमित माळींनी शोधण्याचा प्रयत्न केला. दुकान बंद असल्याने ते लक्ष्मण व अमित कोल्हापूरला परतायला निघाले. वाटेत भरावाजवळ त्यांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिले असता तेजस यांना हातपाय व तोंड बांधून शेतात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उपचारानंतर उशिरा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.