

कोल्हापूर : स्थानिक सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील तीव्र चढ-उतारांमुळे शनिवारी सोने 1,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 7,700 रुपये प्रति किलोने वाढली आहे. सर्व दर जीएसटीसह आहेत.
मागील रविवारी म्हणजे दि. 23 रोजी 24 कॅरेट सोने 1 लाख 27 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅम होते; तर चांदी 1 लाख 57 हजार 900 रुपये प्रति किलो होती. शनिवारी (दि. 29) सोने 1 लाख 31 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचले तर चांदी 1 लाख 77 हजार प्रति किलोवर पोहोचली. आठ दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम 4500 रुपयांनी वाढले आहे, तर चांदी प्रति किलो तब्बल 19 हजार 100 रुपयांनी कडाडली आहे.
वाढत्या दरांबाबत कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, जागतिक बाजारपेठेतील भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे सोने-चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मागणी वाढत आहे. सध्याच्या विक्रमी पातळीवर दर टिकून राहिल्यास लग्न आणि सणासुदीच्या काळात खरेदीचा कल तात्पुरता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दीर्घकाळात या मौल्यवान धातूंचे मूल्य वाढतच जाईल.