

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात (१३ ते १९ नोव्हेंबर) २४ कॅरेट शुद्ध सोने प्रति दहा ग्रॅम ६ हजार रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख ३४ हजार रुपयांवर आले आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १७ हजार २०० रुपयांची घट होऊन दर १ लाख ६६ हजार रुपये प्रति किलोवर स्थिरावले आहेत.
शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) १ लाख ४० हजार रुपये असलेले सोने रविवारी १ लाख ४० हजार २०० रुपयांवर गेले होते. मात्र, सोमवारपासून घसरण सुरू होऊन गुरुवारी सोने थेट १ लाख ३४ हजार रुपयांवर आले.
चांदीही शुक्रवारी असलेल्या १ लाख ८३ हजार २०० रुपयांवरून घसरत १ लाख ६६ हजारांवर आली आहे. लग्नसराईच्या तोंडावर झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आठवडाभरातील दराचा प्रवास (१३ ते १९ नोव्हेंबर)
सोने (प्रति १० ग्रॅम) : १,४०,००० रुपयावरून घसरत गुरुवारी १,३४,००० रुपयावर आले. (एकूण ६,००० ने स्वस्त)
चांदी (प्रति किलो) : १,८३,२०० रुपयावरून घसरत गुरुवारी १,६६,००० रुपयावर आली. (एकूण १७,२०० ने स्वस्त)