

कोल्हापूर : अमेरिकेने भारतीय आयात मालावर पन्नास टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर सोने-चांदीच्या दरात सुरू झालेली तेजी अद्याप कायम असून, या मौल्यवान धातूंनी दराचा नवा विक्रम केला आहे. त्याचबरोबर एका महिन्यातील दरवाढीचादेखील विक्रम झाला आहे.
सोमवारी (दि. 1) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम (जीएसटीसह) 1 लाख 7 हजार 800 रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 27 हजार रुपये या विक्रमी पातळीवर गेला. मागील महिन्यात (1 ऑगस्ट) सोने 1,01,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. सोन्यात 5,900 रुपये वाढ झाली आहे, तर चांदी 1,14,500 रुपये प्रतिकिलो होती. चांदीत 12,500 रुपयांची वाढ झाली आहे.
सराफ बाजार तज्ज्ञांच्या मते, विक्रमी दरवाढीमागे अमेरिकेने वाढवलेले आयात मालावरील टॅरिफ आहे. ‘टॅरिफवॉर’मुळे गुंतवणूकदार जोखमीच्या शेअर बाजाराऐवजी सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत, हे मुख्य कारण आहे. मागणी व पुरवठ्याच्या बदललेल्या गणितामुळे दरांनी ही विक्रमी उसळी घेतली आहे.