

कोल्हापूर : फायनान्स कंपनीकडे तारण सोने विक्रीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी टेंबलाईवाडी येथील संजय महावीर किरंगी (रा. सुदर्शन हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवार, दि. 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
अभिषेक विलास घोलप (रा. संजय गांधीनगर हरियाली व्हिलेज, विक्रोळी मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली आहे. किरंगी याने बागल चौक येथील फायनान्स कंपनीकडे तारण ठेवलेल्या सोन्याची विक्री करतो, असे सांगून फायनान्स कंपनीमध्ये असलेल्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले.
घोलप यांनी त्यांचे मित्र नरेश जैन यांच्याकरवी किरंगी याच्या रुईकर कॉलनीतील एका बँक खात्यावर 9 लाख 50 हजार रुपये जमा केले. उर्वरित 1 लाख 50 हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण 11 लाख रुपये दिले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून संशयिताने 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.