

तानाजी खोत
कोल्हापूर : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यंदा कोल्हापूरचा सराफ बाजार एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 58 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, गेल्या 10 वर्षांतील ही सर्वाधिक वार्षिक दरवाढ ठरली आहे. सोन्याने 1.50 लाखांचा, तर चांदीने 2.50 लाखांचा टप्पा पार केल्यामुळे यंदाची अक्षय खरेदी ग्राहकांसाठी महागडी ठरत असली, तरी सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जात आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्याला पसंती दिली आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्याने मध्यमवर्गीयांची ओढाताण होत असून लग्नसराईच्या खरेदीत मोठे बदल दिसत आहेत. बजेट जपण्यासाठी ग्राहकांचे नवे पर्याय : लाईटवेट ज्वेलरी : दागिन्यांचे वजन कमी करून डिझाईनवर अधिक भर दिला जात आहे.
18 कॅरेटला पसंती : 22 कॅरेटऐवजी अनेक ग्राहक आता 18 कॅरेटचे दागिने खरेदी करत आहेत. डिजिटल गुंतवणूक : तरुण पिढी प्रत्यक्ष दुकानात जाण्याऐवजी मोबाईलवरून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देत आहे. मुहूर्त साधण्यासाठी मोठे दागिने घेण्याऐवजी सोन्याची नाणी किंवा वेढणी घेण्याकडे कल वाढला आहे. ज्यांना सोने घेणे शक्य नाही, त्यांनी चांदीची नाणी किंवा पूजेच्या वस्तू खरेदी करून परंपरेचे पालन केले आहे.