

वारणानगर : पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील प्रताप आनंदराव सूर्यवंशी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी लोखंडी तिजोरीचे कुलूप तोडून सुमारे 11 तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोख 92 हजार रुपये असा सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
चोरट्यांनी राणीहार, नेकलेस, चेन, कानातील दागिने, अंगठ्या, बोरमाळ, सोन्याचे तुकडे तसेच चांदीचे पैंजण व जोडवी असा मौल्यवान ऐवज चोरून नेला. पहाटे पाचच्या सुमारास प्रताप सूर्यवंशी उठल्यानंतर मागील खोलीचा दरवाजा उघडा आढळून आला. आत पाहणी केली असता कपाटातील साहित्य, कपडे व दागिन्यांचे बॉक्स खोलीत विखुरलेले होते. शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्याचेही निदर्शनास आले.
कोडोली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांनीही भेट देऊन माहिती घेतली. श्वान पथक व ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक पथकाने तपास केला असून, काही ठसे मिळाल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोखले गावातही मध्यवस्तीतील चार ठिकाणी चोरीचे प्रकार उघडकीस आले. अभिजित शंकरराव कुलकर्णी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याची चेन, दोन अंगठ्या व रोख रक्कम असा सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. नातेवाईक आजारी असल्याने कुटुंबीय रुग्णालयात गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. तसेच, महादेव कांबळे यांच्या कॉस्मेटिक दुकानातून किरकोळ रोख रक्कम चोरली, तर बाबासो सुतार व बाबासो बापू निकम यांच्या घरांवर चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.