Gokul Election | ‘गोकुळ’ची प्रारूप मतदार यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार ३ ऑगस्टला संपणार निवडणुकीची मुदत
Gokul Election |
Gokul Election | ‘गोकुळ’ची प्रारूप मतदार यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेची मुदत ३ ऑगस्‍टला संपणार आहे. तत्‍पूर्वी किमान प्रारूप मतदार यादी तरी प्रसिद्ध करावी लागणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्‍यासाठी विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी देविदास मिसाळ यांच्‍या हालचाली सुरू आहेत.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने गोकुळची निवडणूक प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार ही मुदत ३ ऑगस्‍ट २०२६ ला संपते. मात्र अद्याप प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध झालेली नाही. त्‍यामुळे न्‍यायालयाच्‍या मुदतीमध्‍ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अशक्‍य आहे. त्‍यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणला सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे मुदतवाढ मागावी लागणार आहे. ही मुदतवाढ मागताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे हे दाखविणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ३ ऑगस्‍टपूर्वी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून निवडणुक प्रक्रिया सुरू आहे, हे दाखविण्‍याचे प्रयत्‍न असणार आहेत.

ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढीची मागणी?

गोकुळ निवडणुकीसाठी आणखी किती कालावधी लागेल अशी विचारणा सहकार निवडणूक प्राधिकरणने विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी मिसाळ यांना केली होती. त्‍यानुसार मिसाळ यांनी ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ आवश्‍यक असल्‍याचे विधिज्ञांना कळविले असल्‍याचे समजते.

कर्मचार्‍यांची ठरावाचे नाव बदलण्‍यासाठी पळापळ

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी आपल्‍या नावावर दूध संस्‍थांचे ठराव दिलेल्‍या कर्मचार्‍यांची आता ठरावाचे नाव बदलण्‍यासाठी पळापळ सुरू आहे. ठरावाचे नाव बदलण्‍याची काय प्रक्रिया आहे, याची माहिती घेण्‍यासाठी काहीजण सहायक निबंधक कार्यालयात फेर्‍या मारत आहेत; तर ठरावाचे नाव बदलण्‍यासंदर्भातील मागणी करणारे आठ अर्ज सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांच्‍याकडे आले आहेत.

सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी नुकतीच प्रारूप मतदार यादी विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांच्‍याकडे सादर केली. दरम्‍यान गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी सहकारातील नियमानुसार गोकुळच्‍या पगारी कर्मचार्‍यांच्‍या नावे ठराव देता येत नाहीत. कर्मचार्‍यांच्‍या नावे सुमारे २२५ ठराव आहेत. हे ठराव बाद करण्‍यात यावेत. तसेच संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी तक्रार विभागीय उपनिबंधक मिसाळ यांच्‍याकडे केली आहे. या तक्रारीनंतर ज्‍या कर्मचार्‍यांच्‍या नावे ठराव सादर केले आहेत, अशा कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news