Gokul Election | ‘गोकुळ’ची प्रारूप यादी पुण्‍यात; प्रसिद्धीनंतर तापणार राजकारण

 Kolhapur Gokul Election |
Gokul Election | ‘गोकुळ’ची प्रारूप यादी पुण्‍यात; प्रसिद्धीनंतर तापणार राजकारण
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीसाठीची प्रारूप यादी अनेक अडथळे पार करत पुण्‍यात पोहोचली. विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ ही यादी प्रसिद्ध करतील. मात्र, यादी प्रसिद्ध करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दूध संस्‍थांच्‍या चौकशीवरून सध्‍या ‘गोकुळ’चे राजकीय वातावरण तापलेले आहे. मात्र, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्‍यावर यादीवर येणार्‍या हरकतींवरूनही राजकारण अधिकच तापणार आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘गोकुळ’ निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. सहायक निबंधकांनी कच्ची मतदार यादी अभिप्रायासह विभागीय उपनिबंधकांकडे सादर केली. मात्र, न्‍यायालयीन बाब, चौकशीमध्‍ये काही संस्‍था असल्‍याने ५,४३९ पैकी किती संस्था वगळायच्या आणि किती ठेवायच्या याचा निर्णय घेणे कठीण जाणार आहे. त्यामुळे ४ ऑगस्टला कोल्‍हापूर सर्किट बेंचमधील सुनावणीनंतरच यादी प्रसिद्ध होण्‍याची शक्‍यता आहे.

पोटनियमांवर बोट, अनेक संस्‍थांचे ठराव अडचणीत

गोकुळ निवडणुकीत यामागे कोरे ठराव प्रकार दुर्लक्षित राहायचा. मात्र, यंदाच्‍या निवडणुकीत प्रचंड ईर्ष्या निर्माण झाल्‍याने पोटनियमांवर बोट ठेवत विरोधकांच्‍या संस्‍था यादीमधून कशा बाहेर जातील, यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. नेते, काही आजी-माजी संचालक यांनी नेहमीप्रमाणे मर्जीतील ‘गोकुळ’चे कर्मचारी, कार्यकर्ते यांच्‍या नावे ठराव दाखल केले आहेत. यादी प्रसिद्ध झाल्‍यावर यावर आक्षेप घेतले जाणार हे निश्‍चित आहे. त्‍यामुळे अनेक संस्‍थांचे ठराव अडचणीत येणार आहेत.

संस्‍था प्रतिनिधींनी घेतला मतदार याद्यांचा आधार

दूध संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्राबाहेरील सभासदाच्‍या नावे ठराव देता येत नाही. मात्र, काहींनी संस्‍थांचे कोरे ठराव घेत मर्जीतल्‍यांच्‍या नावावर दाखल केले आहेत. यामध्‍ये ठरावधारक संस्‍थेचा सभासद असला, तरी तो संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्राबाहेरील आहे. हे सिद्ध करण्‍यासाठी काही संस्‍था प्रतिनिधींनी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या मतदार याद्यांचा आधार घेतला. आतापासूनच यादी ताब्‍यात घेत संबंधित ठरावधारक कार्यक्षेत्राबाहेरील आहे, हे सिद्ध करण्‍याची तयारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news