

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘गोकुळ’च्या मंगळवारी (दि. 9) होणार्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही सभा दुपारी एक वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यात होत आहे.
‘गोकुळ’मध्ये यापूर्वी पक्षीय राजकारण नव्हते. परंतु, यावेळी अध्यक्षपदाच्या निवडीनिमित्त पक्षीय राजकारण शिरले आणि महायुतीचा अध्यक्ष झाला. त्यामुळे शौमिका महाडिक काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. त्यांनी सोमवारी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना व्यासपीठावर न बसण्याचे ठरविले आहे. युतीधर्म पाळण्यासाठी आपण सभासदांमध्ये बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.