Gokul Voters | ‘गोकुळ’चे अठराशे मतदार वाढणार

आतापासूनच आकडेमोड सुरू; वाढीव मतदार कोणाच्या पथ्यावर?
gokul-to-add-1800-new-voters
Gokul Voters | ‘गोकुळ’चे अठराशे मतदार वाढणारFile Photo
Published on
Updated on
विकास कांबळे

कोल्हापूर : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे 1800 सभासद मतदार वाढविण्यात आले असल्यामुळे आणि अध्यक्षपदाच्या निवडीत नेत्यांमध्ये फारसे काही आलबेल नसल्याने निर्माण झालेल्या वातावरणामुळे या वाढीव मतदारांचा कौल कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामीण विकासात मोलाची कामगिरी करणार्‍या गोकुळकडे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे लक्ष असते. गोकुळमध्ये होणार्‍या वार्षिक उलाढालीचे आकडे सर्वच राजकारण्यांना खुणावत असतात. त्यामुळे गोकुळ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व आपल्या वारसाला संचालक करण्याकरिता नेत्यांची धडपड सुरू असते. गोकुळमध्ये जवळपास तीन दशके माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांचे वर्चस्व होते. यामध्ये काहीकाळ आमदार सतेज पाटीलही त्यांच्यासोबत होते. पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या. त्यांनी जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि त्यांना त्यामध्ये यश देखील येत गेले.

संपूर्ण जिल्ह्यावर महाडिक यांचे वर्चस्व होते. त्यालाच सतेज पाटील यांनी शह देण्यास सुरुवात केली. त्याचे कारण देखील गोकुळच होते. गोकुळच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांसाठी जादा जागांचा आग्रह धरला होता, असे समजते. परंतु महाडिक यांनी त्याला विरोध केल्यामुळे दोघांतील अंतर वाढत गेले. पाटील यांनी महाडिक यांचे वर्चस्व असणारी सर्व सत्तास्थाने काढून घेतली. सन 2016-17 च्या निवडणुकीत आ. पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात थेट पॅनेल उभा केले. परंतु थोडक्या मतात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सन 2021 च्या निवडणुकीत त्यांनी महाडिक यांच्या विरोधात आपण एकत्र आलो तर गोकुळमध्ये यश मिळू शकते हे सर्व नेत्यांना पटवून दिले. त्यांनी सर्वांची मोठ बांधत आघाडी केली आणि गोकुळमधील महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली.

गेल्या चार वर्षांपासून गोकुळमध्ये शौमिका महाडिक विरोधकाची भूमिका पार पाडत आहेत. गेल्या वर्षी राज्यातील राजकारणाचीच समिकरणे बदलली आणि जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील एकटे पडले. त्यांच्यासोबत असणारे हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, डॉ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सर्वजण महायुतीमध्ये आहेत. मुश्रीफ सहकारात पक्षीय राजकारण नसते, असे म्हणत पाटील यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अरुण डोंगळे यांच्या राजीनामा प्रकरणाने मात्र नाही म्हटले तरी गोकुळमध्ये त्यांना एक पाऊल मागे यावे लागले. कारण यावेळी सतेज पाटील गटाला अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. महायुतीचा अध्यक्ष व्हावा या डोंगळे यांच्या वक्तव्याने त्यांची थोडी अडचण झाली.

त्यानंतर अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी नेत्यांच्या झालेल्या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे काही नेते उपस्थित नव्हते. यातील एका नेत्याने तर आपणास निरोपच नसल्याचे सांगून गोकुळमध्ये सर्व काही आलबेल सुरू नाही, हे दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर वर्षभरावर आलेल्या गोकुळच्या निवडणुकीची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या निवडणुकीत 3 हजार 659 सभासद मतदार होते. पाच वर्षांमध्ये ही संख्या 5 हजार 470 वर गेली आहे. विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे दोन ज्येष्ठ संचालक तीन दशकांपासून ते गोकुमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे यामध्ये त्यांचाही वाटा नाकारता येत नाही. याशिवाय वाढीव सभासदांमध्ये 550 सभासद मतदार हे गेल्या संचालक मंडळाने केलेले आहेत. त्यामुळे नव्या सत्तारूढ संचालकांच्या काळात वाढविण्यात आलेल्या सभासद मतदारांची संख्या 1225 इतकी होते. यामध्ये सर्व नेत्यांचा कमी अधिक प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे गोकुळच्या आगामी निवडणुकीत होणार्‍या आघाड्या यावरच या वाढीव मतदारांचा कौल दिसून येणार आहे.

जुन्या संचालक मंडळाने मंजूर केलेले 550 मतदार पाच वर्षांत वाढविण्यात आलेल्या 1800 सभासदांपैकी 550 सभासद गेल्या संचालक मंडळाने मंजूर केलेले आहेत. यावेळी हे सभासद मतदानास पात्र झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news