

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी रात्री निरोप आला अन् महायुतीचा ‘गोकुळ’साठीचा जागावाटपाचा तिढा सुटला. मुख्यमंत्र्यांनी २५ जागांसाठी निश्चित केलेल्या सूत्रामध्ये राष्ट्रवादीला ९, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ७ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला २ जागा दिल्या आहेत. ‘स्वीकृत’मधील दोनपैकी राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी एक आणि ‘शासन नियुक्त’ची जागा भाजपला मिळणार आहे. ‘शासन नियुक्त’ची आणखी एक जागा वाढण्याची शक्यता असून तसे झाल्यास ती जनसुराज्यला मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी (दि. ८) अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी, महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांच्या दोनवेळा बैठका झाल्या. मात्र, घटकपक्षांकडे असणार्या ठरावांच्या संख्येवर स्थानिक नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. ठराव पडताळणीदरम्यान वादावादीचे प्रसंगही उद्भवले. स्थानिक पातळीवर हा तिढा न सुटल्याने जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील महायुती नेत्यांची मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीमध्ये राष्ट्रवादीने १०, भाजप-शिवसेनेने प्रत्येकी ८ आणि जनसुराज्यने ३ जागांची मागणी केली. या बैठकीतही तोडगा निघाला नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांत निर्णय कळवतो, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी जिल्ह्यातील महायुती नेत्यांना जागावाटपासंदर्भातील मुख्यमंत्र्यांचा निरोप मिळाला.
नेत्यांचा कस लागणार
जागावाटपाचा तिढा सुटल्याने आता उमेदवार निश्चितीला वेग येणार आहे. तसेच, ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना नेत्यांचा कस लागणार आहे.