

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता घेतल्यानंतर प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलनाचा केलेला संकल्प रविवारी पूर्ण झाला. दूध उत्पादकांचा सक्रिय सहभाग तसेच संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे ‘गोकुळ’च्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक दूध संकलनाचा हा उच्चांक ठरला असल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले. संकलन झालेल्या 20 लाख 5 हजार लिटर दुधापैकी 10 लाख 73 हजार लिटर म्हशीचे, तर 9 लाख 32 हजार लिटर गायीच्या दुधाचा समावेश आहे.
‘गोकुळ’च्या दुधाला वाढती मागणी लक्षात घेऊन सत्तांतरानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार संचालक व प्रशासन यांचे प्रयत्न सुरू होते. ‘गोकुळ’मधील नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनीदेखील प्रत्येक कार्यक्रमात ‘गोकुळ’चे दूध संकलन वीस लाख लिटरवर नेण्यासाठी मार्गदर्शन केले होते. अखेर ‘गोकुळ’ने वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला.
यासंदर्भात बोलताना ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण होणे हे ‘गोकुळ’च्या सातत्यपूर्ण प्रगतीचे, दूध उत्पादक शेतकर्यांच्या द़ृढ विश्वासाचे आणि उत्पादकाभिमुख, पारदर्शक कारभाराचे ठोस प्रतीक आहे, असे सांगितले. ते म्हणाले, ‘गोकुळ’चा कारभार सुरुवातीपासूनच दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून सुरू आहे. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर, अंतिम दूध दर फरक, पशुवैद्यकीय सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य पुरवठा, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले.
25 लाख लिटर दूध संकलनाचा मानस
वीस लाख लिटर दूध संकलन पूर्ण झाल्यानंतर भविष्यात 25 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्याचा मानस असल्याचे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.