

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 30) होणार्या संचालक मंडळाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गोकुळचे नेते हसन मुश्रीफ, डॉ. विनय कोरे व सतेज पाटील यांची शासकीय विश्रामधामवर बैठक झाली. यात अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.
अरुण डोंगळे यांनी गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलाविण्यात आली आहे. अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी नेत्यांनी संचालकांशी चर्चा केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. विनय कोरे, आ. सतेज पाटील यांनी प्रथम बंद खोलीत चर्चा केली. चर्चेनंतर कोरे लगेच बाहेर पडले. यावेळी त्यांनी, महत्त्वाचे काम असल्याने आपण जात गोकुळच्या निवडणुकीत करण्यात आलेल्या आघाडीसोबत आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी संचालकांची मते ऐकून घेतली. त्यांना शुक्रवारी सकाळी आपली पार्टी मिटिंग होईल. त्यामध्ये अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाईल. ते बंद पाकिटातून सभेच्या ठिकाणी पाठविले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
अध्यक्षपदाचे नाव आम्ही शुक्रवारीच जाहीर करू, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुणे व मुंबई येथे नव्याने जागा खरेदी करण्यात येणार आहे. वाशी येथील एनडीडीबीची जागा घ्यावयाची आहे नवीन अध्यक्ष निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
नेत्यांच्या बैठकीला गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते आ. चंद्रदीप नरके, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील अनुपस्थित होते. नेत्यांनी डोंगळे यांचा राजीनामा घेताना एकजूट दाखवली होती. या पार्श्वभूमीवर या नेत्यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात असूनही नेत्यांच्या बैठकीस उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीत मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आबिटकर यांचा प्रचार केला होता. त्या पार्श्वभूमीवर आबिटकर व डोंगळे या दोघांनीही बैठकीकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.