Gokul News | जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आज ‘समविचारी’ची धडक

शासन नियुक्‍त संचालक नियुक्‍तीच्‍या निषेधार्थ संघर्ष मोर्चा
Gokul News |
Gokul News | जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आज ‘समविचारी’ची धडक
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला सत्तासंघर्ष आता रस्त्यावर उतरणार आहे. राज्य शासनाने गोकुळमध्ये चार शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीच्या वतीने आ. सतेज पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली सोमवारी (दि. ९) कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात दूध उत्पादक, सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आघाडीने केले आहे.

शासननियुक्त संचालकांच्या मतदान अधिकाराला न्यायालयात आव्हान

गोकुळच्या सत्तासंघर्षात आता न्यायालयीन लढाईला नवे वळण मिळाले आहे. संघावर चार शासननियुक्त संचालक नेमण्याबरोबरच त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला समविचारी आघाडीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये आव्हान दिले आहे. हा निर्णय सहकारी संस्थेच्या लोकशाही प्रक्रियेविरोधात आणि बेकायदेशीर असल्याचा दावा करत अध्यादेश रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. याचिकेवर आज (सोमवारी) सुनावणी होणार आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (दि. १०) संचालक मंडळाची सभा होणार आहे. दरम्‍यान, राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालकांना संघावर घेण्याचा आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली असून राज्यपालांनीही त्यासंदर्भात वटहुकूम जारी केला आहे; मात्र निवडणुकीत सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांच्या संख्याबळावर परिणाम करणारा हा निर्णय असल्याने समविचारीने शासनाच्या या हस्तक्षेपाला न्यायालयात आव्हान दिले आहे.

दरम्यान, अध्यक्ष निवडीच्या सभेच्या नोटिसा बजावण्यावरूनही नवा पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडून आलेल्या २५ संचालकांना सभेची नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू असताना महायुतीच्या काही संचालकांकडून नोटिसा स्वीकारण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप समविचारी आघाडीने केला आहे. महायुतीच्या १२ संचालकांचे मोबाईल बंद असून काहींचे कुटुंबीय नोटिसा स्वीकारत नाहीत, तर काही संचालकांनी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

नोटीस बजावण्यात अडथळे आणले जात असल्याने समविचारी आघाडीने या मुद्द्यावरही स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या अध्यक्ष निवडीपूर्वी न्यायालय काय भूमिका घेते, यावर गोकुळमधील सत्तासमीकरणाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे.

मोर्चाचा मार्ग असा...

दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्‍या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल. पुढे व्हीनस कॉर्नर, असेंब्‍ली रोडमार्गे मोर्चा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जाईल. तेथे नेत्यांच्या भाषणानंतर जिल्‍हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात येणार आहे. समविचारी आघाडीकडून मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर मंडप उभारण्‍यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.