

धीरज बरगे
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून सत्तांतर घडवून आणलेल्या आमदार सतेज पाटील यांच्यासमोर आता अध्यक्ष निवडीचे आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीत बहुमत मिळाले असले, तरी अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी आवश्यक गणपूर्तीचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबरला होणारी अध्यक्ष निवड ही केवळ एका पदाची निवड न राहता जिल्ह्याच्या सहकारातील राजकीय प्रतिष्ठेची कसोटी बनली आहे.
आ. सतेज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी ‘गोकुळ’चे संस्थापक अध्यक्ष स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची निवडणुकीपूर्वीच घोषणा केली आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळून चुयेकर यांना अध्यक्षपदावर बसविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या सभेला किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आल्याने राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. निवडणुकीतील विजयापेक्षा अध्यक्षपदाची निवड ही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाची आणि महायुतीच्या सहकारविषयक भूमिकेची खरी कसोटी ठरणार आहे. गणपूर्तीचा मुद्दा आणि त्यावरील संभाव्य तोडगा यामुळेच या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महायुतीसमोरही कसोटीची परिस्थिती
आ. सतेज पाटील यांनी सहकारात चुकीचा पायंडा पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करत महायुतीचे संचालक सभेला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ अध्यक्षपद निवडीत संघर्षाचा मार्ग स्वीकारायचा की, बहुमताचा कौल मान्य करून अध्यक्ष निवड निर्विघ्नपणे होऊ द्यायची, याची कसोटी महायुतीसमोरही आहे.
अध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष
गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात २९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता अध्यक्ष निवड प्रक्रिया होणार आहे. या सभेत संचालकांची उपस्थिती, महायुतीची भूमिका आणि गणपूर्तीचा प्रश्न कसा सुटतो, यावर ‘गोकुळ’च्या नव्या सत्ताकारणाची दिशा ठरणार आहे. एका बाजूला बहुमताचा कौल, तर दुसऱ्या बाजूला प्रक्रियेची अट अशा कात्रीत अडकलेल्या या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आ. सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुतीने मंत्री, आमदार आणि खासदारांची ताकद पणाला लावली होती. तरीही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत बहुमत मिळविले. त्यामुळे हा विजय आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाची ताकद दाखवणारा ठरला. आता अध्यक्षपदाची निवड निर्विघ्नपणे पार पाडणे हे त्यांच्या राजकीय व्यवस्थापनाचे पुढील आव्हान आहे.
महायुतीच्या १२ संचालकांची भूमिका निर्णायक?
अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी आवश्यक गणपूर्तीचा प्रश्न निर्माण झाल्याने महायुतीच्या १२ संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे संचालक सभेला उपस्थित राहिल्यास निवड प्रक्रिया पार पडण्याचा मार्ग सुकर होईल. मात्र, अनुपस्थिती किंवा तांत्रिक आक्षेपांची भूमिका घेतली गेल्यास निवड प्रक्रियेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, माजी खा. संजय मंडलिक यांच्या भूमिकेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.