

कोल्हापूर : गोकुळच्या राजकारणात महायुतीमध्ये सुरू असलेला वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईमधून मिटणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. शिंदे यांच्या पुढाकारातून मंगळवारी (दि. 28) शिवसेनेचे गोकुळमधील नेते, संचालक मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. भेटीनंतर गोकुळमधील महायुतीच्या वादावर पडदा पडणार का, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही बैठक गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गोकुळमधील वर्चस्वावरून सध्या महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. विशेषत: भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. यापासून महायुतीचा घटक पक्ष शिवसेना अलिप्त होता; मात्र भाजप-राष्ट्रवादीमधील हा वाद मिटविण्यासाठी आता शिवसेनेच्या संचालकांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीची वेळ मिळविली. सोमवारी (दि.27) ते प्रथम उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. गोकुळमध्ये सध्या सुरू असलेल्या या राजकारणाची माहिती ते उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे समजते. यानंतर मंगळवारी ते शिंदे यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
गोकुळबाबत महायुतीमध्येच सुरू असलेल्या वादापासून उपमुख्यमंत्री शिंदे पूर्णत: अनभिज्ञ होते. हा वाद टोकाला गेल्याने गोकुळमधील शिवसेनेच्या एका संचालकाने या वादाची माहिती शिंदे यांना देत वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केल्याचे समजते. यानंतर शिंदे यांनी या वादासंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून माहिती घेतली. या सर्व घडामोडीनंतर शिंदे यांनी प्रकरणात पुढाकार घेतल्याचे समजते.
गोकुळमध्ये सध्या सुरू असलेल्या भाजप-राष्ट्रवादीमधील वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत यापूर्वीच पोहोचला आहे. भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर उपमुख्यमंत्री काय बाजू मांडणार आणि या वादावर पडदा पडणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. या बैठकीमध्ये गोकुळ निवडणुकीसाठी प्राथमिक जागा वाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत आहे. त्यामुळे 5 मे रोजी गोकुळवर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित आहे. शासकीय का अशासकीय मंडळ येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे; मात्र शासकीय प्रशासक आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपायला आठवडाभराचा कालावधी असून अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे गोकुळवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. गोकुळमधील सध्याच्या हालचाली पाहता प्रशासक निवडीलाही राजकीय रंग आल्याची चर्चा सुरू आहे
27 व 28 एप्रिलच्या सुनावणीकडे लक्ष
गोकुळचे संचालक अपात्र करण्याच्या मागणीवर 27 एप्रिलला, तर दूध संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकेवर 28 एप्रिलला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्देश देणार, यावरही प्रशासक नियुक्ती अवलंबून आहे. सुनावणी महत्त्वपूर्ण असून न्यायालयाच्या निर्देशाकडेही लक्ष असणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चेची शक्यता
गोकुळमधील शिवसेनेचे नेते, संचालक मंगळवारी (दि. 28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. भेटीमध्येही प्रशासक नियुक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्री सामंत यांच्या भेटीचा प्रयत्न
उद्योग मंत्री उदय सामंत शनिवारी कोल्हापूर दौर्यावर होते. गोकुळचे काही संचालक मंत्री सामंत यांच्या भेटीच्या प्रयत्नात होते; मात्र मंत्री सामंत यांना दौरा मध्येच रद्द करत मुंबईला जावे लागले. त्यामुळे संचालकांची मंत्री सामंत यांच्यासोबत भेट होऊ शकली नसल्याची चर्चा आहे.