Gokul politics | गोकुळमध्ये काँग्रेसची कोंडी; गतवेळचे मित्र विरोधात?

महायुतीमधील राजकीय घडामोडींवर आमदार सतेज पाटील यांचे लक्ष
Gokul politics |
Gokul politics | गोकुळमध्ये काँग्रेसची कोंडी; गतवेळचे मित्र विरोधात?Pudhari File Photo
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्हापूर : गोकुळमधील महायुतीच्या राजकारणामुळे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे गतनिवडणुकीत असणारे मित्रपक्ष आता त्यांचेच विरोधक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळमध्ये सध्या काँग्रेसची कोंडी झाली असून निवडणूक एकाकी लढण्याची तयारी आमदार पाटील यांच्याकडून सुरू आहे. महायुतीमधील घडामोडींवर ते लक्ष ठेवून असले, तरी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या द़ृष्टिकोनातून यंत्रणा राबविली जात आहे.

आमदार सतेज पाटील यांनी गोकुळसाठी सुमारे पंधरा वर्षे संघर्ष केला. मे 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने या नेत्यांची मोट बांधत गोकुळची सत्ता मिळविली. यानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणातही झाले. परिणामी, आमदार पाटील यांच्यासोबत असणारे सर्वच नेते सध्या महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आहेत. गोकुळमध्येही ते एकत्र राहतील असे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे आमदार सतेज पाटील यांना गोकुळची लढाईही एकट्यानेच लढावी लागणार आहे.

महायुतीचे तगडे आव्हान

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सध्या जिल्ह्यात वर्चस्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस सत्तेपर्यंत पोहोचली नाही, तरी ‘हम भी किसी से कम नही..’ हे आ. पाटील यांनी दाखवून दिले; मात्र मविआमधील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिल्ह्यात ताकद कमी पडत आहे. त्यामुळे गोकुळमध्ये आ. पाटील यांच्यासमोर महायुतीचे तगडे आव्हान असणार आहे.

आघाडी-बिघाडीवर ठरणार सत्ताकारण

गोकुळवरून सध्या महायुतीमध्ये ताणाताणीचे वातावरण आहे. निवडणुक महायुती एकत्र लढणार का? नेत्यांमधील वर्चस्ववादामुळे बिघाडी होणार, यावर गोकुळचे सत्ताकारण ठरणार आहे. वाद मिटून महायुती एकसंध राहिल्यास काँग्रेससमोर महायुतीचे तगडे आव्हान राहील, तर महायुतीत बिघाडी झाल्यास तुल्यबळ आघाड्या होऊन चुरस वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news