

कोल्हापूर : दसर्याला गोकुळचे तापलेले राजकीय वातावरण शांत होणार तोच दिवाळीनंतर जिल्हा बँकेचे फटाके वाजणार आहेत. गोकुळची निवडणूक प्रक्रिया संपताच काही दिवसांतच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. कोणताही न्यायालयीन पेच निर्माण न होता निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू राहिल्यास डिसेंबरअखेरीस जिल्हा बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बँकेची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीवर हरकती घेणे, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय दिल्यानंतर ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यानंतर साधारण एक दहा ते पंधरा दिवसांनी म्हणजेच दिवाळीनंतर बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
गोकुळ निकालाचे पडसाद जिल्हा बँकेत
गोकुळच्या निवडणुकीत दूध संस्था पात्र-अपात्रतेचा वाद, प्रशासक नियुक्ती अशा विविध मुद्द्यांवरून महायुतीअंतर्गत असलेला वाद चांगलाचा गाजला. सहा महिन्यांच्या धुसफुशीनंतर हा वाद शांत झाला. जागा वाटपात सर्वजण एकत्र आले असले, तरी महायुती निवडणुकीत एकसंध राहणार का, हे निकालनंतरच स्पष्ट होईल. गोकुळच्या निकालाचे पडसाद त्यानंतर होणार्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. त्यामुळे गोकुळच्या निकालावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र ठरणार आहे.
व्यक्ती सभासद गटात दोनच मतदार
व्यक्ती सभासद गटात ६५३ सभासद आहेत. यापैकी केवळ दोनच सभासद हयात आहेत. उर्वरित सर्व सभासद मृत झाले आहेत, तर मौैनी विद्यापीठ, गारगोटी आणि मराठा मंडळ इचलकरंजी या दोन संस्थांही या गटात आहेत; मात्र त्यांचा संस्था गटात समावेश आहे.