

कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याच्या पोटनियम दुरुस्तीस मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष नविद मुश्रीफ होते. दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येईल. बैठकीत म्हशीचे 50 हजार लिटर दूध बाहेरून खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली.
‘गोकुळ’च्या संचालकांची संख्या वाढविण्यासंदर्भात काही महिन्यांपासून आघाडीचे नेते व संचालकांमध्ये चर्चा सुरू होत्या. संख्या वाढविण्यासाठी पोटनियमात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी प्रस्ताव संचालक बैठकीसमोर ठेवला. यावर शौमिका महाडिक यांनी या विषयाला आपला विरोध नाही, असे स्पष्ट करून विषयपत्रिकेवरील अन्य विषयांप्रमाणे हा विषय नाही. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. याबाबतीत नेत्यांशी चर्चा होणे आवश्यक आहे. घाईगडबडीने तो मंजूर न करता हा विषय पुढील बैठकीत घ्यावा, असे सांगितले. म्हशीच्या दूध विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विक्रीसाठी दूध कमी पडत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी बाहेरून 50 हजार लिटर दूध खरेदीच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बाहेरून म्हशीचे दूध खरेदीचा निर्णय घेण्यात आला.