

आशिष ल. पाटील
गुडाळ : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला असून १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे तर १८ ऑक्टोबर रोजी २५ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मौसमी चौगले आणि जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांनी तयार केलेल्या निवडणूक कार्यक्रमास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे.
नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर अशी असेल. २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. वैध नामनिर्देशन पत्राची यादी २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत असून ८ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल. ९ ऑक्टोबर रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल. उमेदवारांना प्रचारासाठी नऊ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.